दीपक मेटील ल्ल सडोली (खालसा)परिते जिल्हा परिषद मतदारसंघ अगोदर ओबीसी पुरुषासाठी राखीव झाला होता. त्यामुळे खुल्या प्रवर्गातील इच्छुकांची निराशा झाली होती; परंतु या मतदारसंघाच्या आरक्षण सोडतीवर हरकती आल्यामुळे फेरआरक्षण सोडत काढली. यामध्ये हा मतदारसंघ सर्वसाधारण खुला झाल्याने खुल्या प्रवर्गातील इच्छुक उमेदवारांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत. याबरोबर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपदही खुल्या वर्गासाठी असल्याने अध्यक्षपदाचा दावेदार या मतदारसंघातील उमेदवार असणार आहे. येथून माजी आमदार पी. एन. पाटील यांचे चिरंजीव राहुल पाटील निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची शक्यता आहे. या मतदारसंघासाठी कॉँग्रेस विरुद्ध सर्व पक्ष अशा लढती झाल्या आहेत. १९९१ साली तत्कालीन शाहू आघाडीचे बाबूराव हजारे यांनी कॉँग्रेस पक्षाचे बाळासाहेब कारंडे यांच्यावर निसटता विजय मिळविला होता. २००२ साली कॉँग्रेसचे अनिल ढवण विरुद्ध बाबूराव हजारे अशी लढत झाली. यामध्ये अनिल ढवण हे विजयी झाले होते. सन २०१२च्या निवडणुकीत तिरंगी निवडणूक लढली. राष्ट्रवादी- शेकापकडून सुनीता कांबळे (हळदी) व आरपीआय-शिवसेनेच्या कल्पना वाशीकर यांच्यावर कॉँग्रेसकडून शांताबाई कांबळे यांनी विजय मिळविला होता. आगामी निवडणुकीसाठी माजी आमदार पी. एन. पाटील यांचे चिरंजीव राहुल पी. पाटील यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीचा श्रीगणेश करण्यासाठी या मतदारसंघाची निवड केली आहे. राहुल नसले तर कॉँग्रेस पक्षात दत्तात्रय मेडसिंगे (कांडगाव) यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. या भागात कॉँग्रेस पक्ष रुजविण्यासाठी मेडसिंगे घराण्याचा फार मोठा वाटा आहे. तसेच संदीप पाटील हेही कॉँग्रेसचे निष्ठावत कार्यकर्ते आहेत. तसेच शिवाजी पाटील (देवाळे), सर्जेराव पाटील (हळदी), शंकर पाटील (हळदी), बी. ए. पाटील हेही इच्छुक आहेत. यामुळे कॉँग्रेसमध्ये इच्छुकांची भाऊगर्दी वाढली आहे. शिवसेनेमधून उपजिल्हाप्रमुख प्रा. शिवाजीराव पाटील-सडोलीकर हे इच्छुक असून, शेतकरी कामगार पक्षातून ज्येष्ठ नेते केरबा पाटील यांचे चिरंजीव शरद पाटील व हळदीचे माजी सरपंच सचिन पाटील यांनी शड्डू ठोकला आहे, तर राष्ट्रवादी पक्षातून भोगावती साखर कारखान्याचे दोन उपाध्यक्ष हंबीरराव पाटील, नामदेव पाटील हे इच्छुक असून बाबूराव हजारे यांनीही उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. या मतदारसंघात भाजपने उमेदवारीसाठी चाचपणी सुरू केली असून, याशिवाय स्वाभिमानी शेतकरी संघटना, आर.पी.आय.चे उमेदवारही असण्याची शक्यता आहे. वाशी पंचायत समिती गण सर्वसाधारण महिलावर्गासाठी असून, सन २०१२ साली सर्वसाधारण पुरुषासाठी आरक्षित झाला होता. त्यावेळी तिरंगी निवडणूक झाली होती. यामध्ये कॉँग्रेसचे कै. आनंदराव मेडसिंगे हे निवडून आले होते. मेडसिंगे यांच्या निधनानंतर श्रीमती जयश्री मेडसिंगे यांची बिनविरोध निवड झाली. यावेळी कॉँग्रेसमधून तालुका युवक कॉँग्रेसचे उपाध्यक्ष कृष्णात धोत्रे यांनी कॉँग्रेस पक्षातून आपल्या पत्नी रूपाली धोत्रे यांच्यासाठी उमेदवारी मागितली आहे. कॉँग्रेस पक्षातून हे एकमेव इच्छुक आहेत, तर शिवसेना-राष्ट्रवादी आघाडीतून सुरेखा चव्हाण (कांडगाव), भाजपच्या सुनीता चव्हाण यांनी उमेदवारी मागितली आहे.परिते पंचायत समिती मतदारसंघ हा ओ.बी.सी. पुरुषासाठी आरक्षित झाला असून, मागीलवेळी स्वाती पवते या राष्ट्रवादी व शिवसेनेशी टक्कर देऊन निवडून आल्या होत्या. यावेळी राष्ट्रवादी पक्षातून पांडुरंग परीट हे इच्छुक असून, कॉँग्रेसमधून पांडुरंग चव्हाण (कुरुकली), बुवा (कोथळी), शिवाजी कारंडे (बेले) हे इच्छुक आहेत.परिते जि. प. व दोन मतदारसंघांत एकंदरित कॉँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत आहे, तर शेतकरी कामगार पक्ष व शिवसेना आघाडी होण्याची शक्यता आहेत.
परितेमधून अध्यक्षपदासाठी दावेदारी
By admin | Updated: January 18, 2017 01:05 IST