कोल्हापूर : भाजपने ‘कोल्हापूर उत्तर’वर दावा सांगून खळबळ उडवून दिली आहे. या मतदारसंघातून नगरसेवक आर. डी. पाटील यांची उमेदवारी पुढे आली आहे. त्यांनी निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यांच्या उमेदवारीला जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत आज, गुरुवारी पाठिंबा दर्शविण्यात आला. या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व सध्या शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर करीत आहेत, असे असताना भाजपने केलेल्या दाव्यामुळे येणाऱ्या काळात भाजप-शिवसेनेत चांगलीच जुंपण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आज झाली. यावेळी पदाधिकाऱ्यांनी आपली मते मांडली. गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेचे काही नेते व पदाधिकाऱ्यांकडून ‘कोल्हापूर दक्षिण’ विधानसभा मतदारसंघावर दावा सांगितला जात आहे. हा मतदारसंघ भाजपच्या वाट्याला असताना शिवसेनेकडून खोडसाळपणे हा दावा केला जात आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर केंद्रासह राज्यातही सर्वांत जादा जागा जिंकून भाजप हा सर्वांत मोठा पक्ष म्हणून पुढे आला आहे. असे असताना आघाडी धर्म केवळ भाजपनेच का पाळायचा? अशा भावना कार्यकर्त्यंानी मांडल्या. शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या अंतर्गत गटबाजी व बंडाळीमुळे सेनेचे काही पदाधिकारी बेजबाबदार वक्तव्ये करीत सुटले आहेत. त्यामुळे पक्ष नेतृत्वाने व पक्षाने जरी युती अभेद्य ठेवण्याचे ठरविले, तरी ‘कोेल्हापूर उत्तर’मध्ये मैत्रिपूर्ण लढत लढण्याची पक्षाची तयारी असेल, असा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी नगरसेवक आर. डी. पाटील यांच्या मागणीचा विचार निश्चितपणे होईल, असे सूतोवाच पदाधिकाऱ्यांकडून बैठकीत करण्यात आले.यावेळी महानगर जिल्हाध्यक्ष महेश जाधव, सुभाष रामुगडे, प्रभा टिपुगडे, अशोक देसाई, संतोष भिवटे, अमोल पालोजी, राहुल चिकोडे, मामा कोळवणकर, विजय जाधव, दिलीप मैत्राणी, मारुती भागोजी, सुरेश जरग, संदीप देसाई, भारती जोशी, किशोरी स्वामी, तेजस्विनी हराळे, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
भाजपचा ‘कोल्हापूर उत्तर’वर दावा
By admin | Updated: July 18, 2014 00:52 IST