कोल्हापूर : मुंबई उच्च न्यायालयाचे ‘सर्किट बेंच’ कोल्हापुरात स्थापन व्हावे, या मागणीसाठी आज, शनिवारी होणाऱ्या राष्ट्रीय लोकअदालतीच्या कामकाजापासून अलिप्त राहण्याचा निर्णय जिल्ह्यातील वकीलबांधवांनी घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून कोल्हापुरातील टाऊन हॉल येथील जिल्हा व सत्र न्यायालयासमोर सकाळी दहा वाजता निदर्शने करण्यात येणार आहेत. दरम्यान, या लोकअदालतीमध्ये सहभागी होऊ नये व आंदोलनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा बार असोसिएशनचे सचिव अॅड. राजेंद्र बी. मंडलिक यांनी केले आहे.कोल्हापूरसह सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर या सहा जिल्ह्णांतील वकील ज्या-त्या ठिकाणी होणाऱ्या राष्ट्रीय लोकअदालतीच्या स्थळी निदर्शने करणार आहेत. सर्किट बेंचप्रश्नी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाने सर्किट बेंच ठरावाच्या मागणीला मान्यता दिली आहे परंतु, उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश व राज्यपालांच्या अखत्यारित हा प्रश्न असूनही सर्किट बेंच स्थापन करण्याचे या दोघांना अधिकार आहेत तरीही, मुख्य न्यायाधीशांनी सरकारच्या कोर्टात चेंडू टाकला. शुक्रवारी (दि. १७) मुंबईतील आझाद मैदान येथे लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे.दरम्यान, आज, शनिवारी होणाऱ्या निदर्शनांमध्ये जिल्ह्यातील सर्व वकील सहभागी होणार आहेत. यावेळी राष्ट्रीय लोकअदालतीला येणाऱ्या पक्षकारांना आम्ही समजावून सांगणार आहे, अशी माहिती कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे सेक्रेटरी अॅड. राजेंद्र मंडलिक यांनी सांगितले.
सर्किट बेंचप्रश्नी आज वकिलांची निदर्शने
By admin | Updated: April 11, 2015 00:09 IST