कोल्हापूर : मुंबई उच्च न्यायालयाचे ‘सर्किट बेंच’ कोल्हापुरात स्थापन व्हावे, या तीस वर्षांच्या मागणीसाठी उद्या, शनिवारी होणाऱ्या राष्ट्रीय लोकअदालतीवर बहिष्कार टाकून प्रत्येक जिल्हा व तालुका स्तरावर न्यायालयाच्या प्रवेशद्वारांवर निदर्शने करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर शुक्रवारी (दि. १७) मुंबईतील आझाद मैदान येथे एक हजार वकिलांच्या उपस्थितीत लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे, अशी माहिती खंडपीठ कृती समितीचे निमंत्रक अॅड. विवेक घाटगे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. अॅड. घाटगे म्हणाले, उच्च न्यायालयाच्या सर्व अटींची पूर्तता केली जाईल तसेच याप्रश्नी मंत्रिमंडळासमोर विषय ठेवण्यास मंजुरी दिली असून, अधिवेशन संपल्यानंतर होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठराव करून तो उच्च न्यायालयाकडे पाठविला जाईल, अशी हमी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खंडपीठ कृती समितीला दिली होती. मंत्रिमंडळाच्या बैठका सुरू होऊनही ठराव केलेला नाही तसेच उच्च न्यायालयाने केलेल्या मंत्रिमंडळाच्या ठरावाची मागणी ही पूर्णत: चुकीची आहे. आपल्या कोर्टातला चेंडू शासनाच्या कोर्टात टाकण्याचा प्रयत्न मुख्य न्यायाधीशांकडून केला जात आहे. सर्किट बेंच स्थापण्याचे सर्वाधिकार उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश व राज्यपालांना आहेत, असे असतानाही उच्च न्यायालय शासनाच्या ठरावाची मागणी करत आहे. या भूमिकेमुळे सहा जिल्ह्यांतील वकीलवर्गात संतापाची लाट उसळली आहे. या उच्च न्यायालयाच्या चुकीच्या निर्णयाच्या विरोधात शनिवारी राष्ट्रीय लोकअदालतीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे तसेच न्यायालयाच्या प्रवेशद्वारासमोर निदर्शनेही करण्यात येणार आहे. तसेच १७ एप्रिलला आझाद मैदान येथे लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे. यावेळी कोल्हापूरसह सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर येथील एक हजार वकील सहभागी होणार आहेत. (प्रतिनिधी)
सर्किट बेंचप्रश्नी वकिलांचा उद्याच्या
By admin | Updated: April 10, 2015 00:23 IST