इचलकरंजी : येथील चौंडेश्वरी सहकारी सूतगिरणीच्या मतदानावेळी गैरसमजातून शाब्दिक चकमक उडाली. त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आणि त्याचे पर्यवसान अंगावर धावून जाणे व धक्काबुक्कीमध्ये झाले. या संतप्त जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. दुपारी अडीच वाजता झालेल्या या घटनेचे पडसाद षटकोन चौकातील एका घरावर दगडफेक होण्यामध्ये झाले. तेथील एक मोटारसायकल व एक स्कूटी यांची मोडतोड करण्यात आली. चौंडेश्वरी सूतगिरणीच्या निवडणुकीमध्ये दोन गटांत सरळ लढत होत असल्याने कमालीची स्पर्धा होती. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासूनच दोन गटांमध्ये परस्परांवर टीकाटिप्पणी चालू होती. तसेच दोन्ही गटांमध्ये उभे असलेल्या उमेदवारांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात येत होते. दोन्ही गटांचे उमेदवार मतदारांच्या घरोघरी जाऊन प्रचार करीत असल्याने चुरस निर्माण झाली होती. अशा वातावरणात रविवारी मतदान होत असताना दोन्ही बाजंूचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. केंद्राच्या ठिकाणी महिलांसह सुमारे दीड हजारजणांच्या जमावाने गर्दी केली होती. परिणामी केंद्रासमोरील रस्त्यावरील वाहतूक अन्यत्र वळविण्यात आली. दुपारी सव्वादोन वाजण्याच्या सुमारास मतदान केंद्रावर उपस्थित असलेल्या समर्थकांमध्ये रागाने बघितल्याच्या कारणावरून वाद झाला. त्याचे पर्यवसान दोन्ही बाजंूच्या समर्थकांमध्ये शाब्दिक चकमक उडून परस्परांवर धावून जाण्याचा प्रकार घडला. बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करीत सौम्य लाठीमार करून जमावाला पांगविले. या घटनेवेळी षटकोन चौकात राहणारे श्रीनिवास फाटक हे आक्रमक असल्याच्या कारणावरून ४०-५० जणांच्या एका गटाने त्यांच्या घरावर जाऊन दगडफेक केली. घरासमोर उभ्या केलेल्या मोटारसायकल (एमएच ०९ बीडी ३५००) व स्कूटी (एमएच ०९ बीएफ ३५००) यांच्यावर मोठे दगड घालून त्यांचे नुकसान केले. तीन वाजण्याच्या सुमारास झालेल्या दगडफेकीत त्यांच्या दोन मजली घराच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या. अचानक हा प्रकार झाल्यामुळे घरातील सर्वजण भेदरून गेले. मात्र, आलेल्या जमावाने दगडफेक करून तेथून काढता पाय घेतला. फाटक यांच्या घरावर दगडफेक झाल्याचे मतदान केंद्रावर समजताच तेथेही तणाव निर्माण झाला होता. मात्र, एका लोकप्रतिनिधीचा दूरध्वनी फाटक यांचे समर्थक असलेल्या नेत्याच्या मोबाईलवर आला. त्यांनी झालेल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त करून दगडफेकीत झालेले नुकसान भरून देण्यात येईल, असे सांगितले. त्याचा परिणाम म्हणून मतदान केंद्रावरील तणाव निवळला. पुढे सायंकाळी पाच वाजेपर्यंत शांततापूर्ण वातावरणात मतदान चालू राहिले. मात्र, मतदान संपल्यानंतर दोन्ही गटांच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी करून वातावरण दणाणून सोडले. (प्रतिनिधी)
‘चौंडेश्वरी’च्या निवडणूक वादात घरावर दगडफेक
By admin | Updated: May 4, 2015 00:56 IST