जोतिबा : श्री क्षेत्र जोतिबा डोंगर येथील श्री चोपडाई देवीच्या मंदिरात मंगळवारी किरणोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी सूर्यकिरणांनी देवीचे मुखदर्शन घेतले. देवीचे दिव्य रूप सूर्यकिरणांनी झळाळून निघाले.श्री चोपडाईदेवीच्या मंदिरात सायंकाळी सहा वाजून १७ मिनिटाला सूर्यकिरणांनी प्रवेश केला. प्रथम देवीच्या चरणस्पर्शानंतर छातीवर किरण स्थिरावले. सहा वाजून १९ मिनिटाला सूर्यकिरणे देवीच्या मुखापर्यंत गेली. तीन ते चार मिनिटे ही सुवर्णकिरणे देवीच्या मुखावर स्थिर झाली. हे विलोभनीय दृश्य पाहण्यासाठी भाविकांनी मंदिरात मोठी गर्दी केली.किरणोत्सव होताच महाघंटेचा नाद करण्यात आला. श्रींचे मुख्य पुजारी यांच्या हस्ते देवीची ओटी भरून आरती करण्यात आली. त्यानंतर प्रसाद वाटप केला. चोपडाईदेवी मंदिराचे खंडकरी केदार शिंगे, स्वप्नील दादर्णे, शुभम झुगर, तुषार झुगर, विकास सांगले, नेताजी दादर्णे, आदी उपस्थित होते. श्री चोपडाईदेवीचा किरणोत्सव उत्तरायण व दक्षिणायण या कालावधीत वर्षांतून दोनवेळा होतो. (वार्ताहर)किरणोत्सव तारखेचे सूत्रश्री चोपडाई देवीच्या मंदिरात होणाऱ्या किरणोत्सव तारखेचे सूत्र आहे. यावरूनच नेमकी तारीख ठरवली जाते. उत्तरायण सुरू झाल्यानंतर समान दिवस शोधला जातो. म्हणजे १२ तासांचा दिवस व १२ तासांची रात्र पाहिली जाते. २१ मार्च हा दिवस समान दिवस यावेळी आला. समान दिवसापूर्वी २५ दिवस अगोदरची तारीख ही किरणोत्सवाची तारीख ठरवली गेली. ही तारीख २३ फेब्रुवारी आली. दक्षिणायणमध्ये २३ सप्टेंबर हा समान दिवस येतो. या दिवसानंतरचे पुढील २५ दिवसांची तारीख किरणोत्सवाची ठरवली जाते, अशी माहिती किरणोत्सवाचे अभ्यासक नेताजी दादर्णे यांनी सांगितली.
सूर्यकिरणांनी घेतले चोपडाईदेवीचे मुखदर्शन
By admin | Updated: February 25, 2015 00:44 IST