कोल्हापूर : दोन्ही कॉँग्रेस स्वबळावर लढलो, तर कोल्हापूर जिल्ह्यातील दहा पैकी किमान आठ जागा निवडून आणू, असे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना आपण सांगितले असल्याचे प्रतिपादन धनंजय महाडिक यांनी केले. करवीर तालुका राष्ट्रवादी कॉँग्रेसच्यावतीने आज, मंगळवारी शाहू स्मारक भवन येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी महापौर आर. के. पोवार होते. यावेळी महाडिक म्हणाले, सध्या स्वबळावर की आघाडी होणार याबाबत जोरदार चर्चा आहे. स्वबळावर लढलो तर, आणि आघाडी करून लढलो तर काय होईल, असे राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी आपणाला विचारले होते. यावर आघाडी केली तर तीन जागा येतील आणि स्वबळावर लढलो तर किमान आठ जागा निवडून आणू, असे पवार यांना सांगितले. आपल्या विजयात करवीरकरांचा मोठा वाटा आहे. कोल्हापूरच्या जनतेने टाकलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. संसदेच्या अधिवेशनात आपण ४२ प्रश्न उपस्थित केले. अनेक मागण्या केल्या, त्याचा पाठपुरावा सुरू आहे. रंकाळा, पंचगंगा, महालक्ष्मी मंदिर येथील रस्ते यांसह विविध प्रश्न तडीस नेण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. स्वर्गीय दिग्विजय खानविलकर यांच्या निधनानंतर तालुक्यात विस्कळीतपणा आला असला, तरी मधुकर जांभळे यांच्या टीमने चांगली बांधणी केली असून, कार्यकर्त्यांना लागेल ती मदत करण्याची तयारी असल्याचे त्यांनी सांगितले. खासदार महाडिक, अरुंधती महाडिक, महापौर तृप्ती माळवी, ए. वाय. पाटील, एस. डी. पाटील, भैया माने, आर. के. पोवार, मधुकर जांभळे, प्रदीप पाटील यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मधुकर जांभळे यांनी प्रास्ताविक केले. ‘भोगावती’चे अध्यक्ष धैर्यशील पाटील, चंद्रकांत बोंद्रे, अनिलराव साळोखे, संगीता खाडे, उदयानीदेवी साळुंखे, विश्वनाथ पोवार, सुनील कारंडे, रघुनाथ जाधव, दत्ता गाडवे, जी. डी. पाटील, शिवाजी देसाई, रंगराव कोळी, सुनील परीट, राजाराम कासार, आदी उपस्थित होते. नामदेवराव पाटील यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
स्वबळावर आठ जागा निवडून आणू
By admin | Updated: August 20, 2014 00:37 IST