दिलीप मोहिते - विटा -प्राथमिक व माध्यमिक शाळांना उन्हाळ्याची सुट्टी लागल्याने परीक्षेमधून मोकळ्या झालेल्या बालकांना जेवण व पैशाचे आमिष दाखवून ढाब्यांवर काम करण्यासाठी ढाबा मालकांनी लक्ष्य केले आहे. अवघ्या शे-पाचशे रुपयांच्या तुटपुंज्या पगारावर शाळेतील कोवळ्या मुलांना रात्री एकपर्यंत ढाब्यातील उष्टे व खरकटे काढण्यास भाग पाडले जात असल्याचे धक्कादायक प्रकार विट्यातील अनेक ढाब्यांवर पाहावयास मिळत असून, याकडे बालकामगारविरोधी विभागाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याची चर्चा शहरात सुरू आहे. दरम्यान, शहरातील बऱ्याच ढाब्यांना परवानाच नसला तरी, ते ढाबे अन्न, भेसळ व औषध विभागातील अधिकाऱ्यांच्या वरदहस्ताने खुल्लमखुल्ला सुरू असल्याचे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे.विटा शहर सांगली जिल्ह्यात सुवर्णनगरी म्हणून ओळखले जाते. सध्या यात्रांचा हंगाम सुरू असल्याने गलाई बांधव, नोकरदार आणि विविध व्यावसायिक गावाकडे आले आहेत. त्यामुळे सुवर्णनगरी विटा शहरातील ढाबा संस्कृती फुलून गेली आहे. अशा परिस्थितीत ढाब्यांवर काम करणाऱ्या लोकांना जास्त पगार द्यावा लागत असल्याने उन्हाळी हंगामात शालेय लहान मुलांना भोजन व पैशाचे आमिष दाखवून ढाब्यात उष्टे व खरकटे काढण्याचे काम दिले गेले आहे.विट्यातील अनेक ढाब्यांवर मोठ्या प्रमाणात बालकामगारांची भरती केली आहे. शासनाकडून वारंवार बालमजुरी थांबविण्यासाठी मोठ्या प्रमाणात जाहिरातबाजी केली जाते. बालकामगारांची सुटका करण्यासाठी शासनाने स्वतंत्र विभागही तयार केला आहे. परंतु, या विभागाने गांधारीची भूमिका घेतली असल्याने शहरातील बऱ्याच ढाब्यांवर बालकामगारांचा राबता वाढला आहे. शहरातील काही ढाबे अन्न, भेसळ व औषध विभागाच्या परवानगीशिवाय सुरू आहेत. बऱ्याचजणांकडे परवाने नाहीत, मेनू कार्ड नाहीच शिवाय साधा दरफलकही ढाब्यांवर लावण्यात आलेला नाही. त्यामुळे शासनाचे स्वतंत्र विभाग काय करतात?, असा सवाल आहे. बालमजुरी थांबवावी...विटा शहरात असणाऱ्या अनेक ढाब्यांवर ८ ते १२ वर्षांखालील मुलांना रात्री एकपर्यंत राबवून घेतले जात आहे. त्यांचा पगार दररोजच्या दररोज केला जातो. या मुलांना उष्टी भांडी जमा करणे, खरकटे काढणे, टेबल साफ करून घेणे, ग्राहकांना पाणी देणे यासह अन्य कामे लावली जात आहेत. काही चिमुरड्यांना किचनमध्येही कामाला लावले जाते. त्यामुळे बालकामगारांची ढाबा चालकांकडून पिळवणूक होत असून, बालकामगारविरोधी विभागाने मध्यरात्रीपर्यंत शहरातील ढाब्यांवर राबणाऱ्या बालकामगारांची सुटका करण्याची मागणी होत आहे.
ढाब्यांवर बालकामगारांचा राबता
By admin | Updated: April 13, 2015 00:02 IST