नितीन भगवान -- पन्हाळा पन्हाळ्यातील पावनगडावर असलेल्या मदरशामध्ये बिहारमधील २१ मुले शिक्षण घेण्यासाठी आली असून, गेले महिनाभर या मुलांना पोटभर अन्न मिळालेले नाही. कुडकुडणाऱ्या थंडीत त्यांना पुरेसे पांघरायलाही नाही. त्यांच्या शिक्षणाकडे डोळेझाक होत असून रोजच्या व्यवहारातील कोणतेही शिक्षण दिले जात नाही. येथील सेवा मदतीवर अवलंबून असून, मदत अपुरी मिळते. त्याचाही गैरवापर होत असल्याचे समजते. पावनगडावर बहुतेक मुस्लिम वस्ती आहे. या ठिकाणी सालिक मोमीन शेख याने बिहारमधील आरडिया जिल्ह्यातील डुबा या एकाच गावातील या सर्वांना शिक्षण देतो म्हणून आणल्याचे मुलांनी सांगितले. गेले वर्षभर या मुलांची पावनगडावर पूर्वी बंद असलेल्या मदरशाच्या खोल्यांमध्ये राहण्याची व्यवस्था केली आहे. ५ ते १४ वयोगटांतील ही २१ मुले आहेत. मदरशाजवळच्या विहिरीतून या सर्व मुलांना पिण्यासह अंघोळीचे पाणी दिले जाते. मात्र, हे पाणी पिण्यायोग्य नाही. याठिकाणी संपूर्ण सेवा मदतीवर अवलंबून आहे. मात्र, मदत अपुरी आहे. त्यातच या मदतीचा गैरवापर होत असल्यामुळे या मुलांना गेले महिनाभर पोटभर अन्न मिळालेले नाही. अंग गोठवणारी थंडी असूनही पुरेसे पांघरूणदेखील नाही. पावनगडावर राहणाऱ्या बहुतेक जणांना या मुलांची परिस्थिती माहीत असल्याने काहीजण त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करत आहेत, तर येथील शिक्षक मुलांच्या मदतीसाठी निव्वळ फिरत असतात.या मुलांना उर्दू, अरेबीसह इंग्रजी शिक्षण देत असल्याचे तेथील शिक्षक सांगतात. तथापि, या मुलांना तसे काही शिकविले जात नसल्याचे या मुलांशी बोलल्यानंतर लक्षात आले. पन्हाळा हे तालुक्याचे ठिकाण आहे. या ठिकाणी उपविभागीय कार्यालयापासून सर्वच कार्यालये आहेत. या सर्वच कार्यालयांकडे चौकशी केली असता याठिकाणी अशा पद्धतीची शाळा चालू आहे हे माहीत नसल्याचे त्यांनी सांगितले. मग या मुलांच्या भवितव्याकडे कोण पाहणार, हा प्रश्न आहे. पन्हाळ्यातील शिक्षण विभागाला पावनगडावर अशी शाळा सुरू आहे हे माहीत नाही. त्याची आमच्याकडे नोंद नाही. खरंतर ही मुले शाळाबाह्य आहेत. आज, शुक्रवारी या मुलांची भेट घेणार आहे. त्यांच्या सर्वांगीण शिक्षणाची सोय करण्यासाठी प्रयत्न केला जाईल. - सारिका कासोटे, गटशिक्षण अधिकारी, पन्हाळा आरोग्याचा प्रश्नही गंभीर या ठिकाणी शाळा चालू आहे हेच शिक्षण विभागाला माहीत नाही. शाळाबाह्य मुलांच्या नोंदणीमध्ये ही मुले नोंद नाहीत. नगरपरिषद हद्दीत ही शाळा येत असल्याने याठिकाणचे विहिरीचे पाणी, त्याची स्वच्छता यासाठी नगरपरिषद काही करत नाही. तालुका वैद्यकीय अधिकारीही भेट देत नाहीत. त्यामुळे हा सगळाच अनागोंदी कारभार सुरू आहे. यात मुलांची मात्र हेळसांड होत असून, त्यांच्या आरोग्याचा प्रश्नही गंभीर आहे.
पावनगडावरील मदरशामध्ये मुलांची हेळसांड
By admin | Updated: January 20, 2017 01:18 IST