कोल्हापूर : लिंगायत समाजाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या राज्य सरकारला जाग आणण्यासाठी आज, सोमवारी राज्यभरातून समाजबांधवांनी १ लाखांहून अधिक मागण्यांचे मेल करून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा ‘ईमेल आयडी’ ब्लॉक केला. या अभिनव आंदोलनाची दिवसभर चर्चा होती; परंतु या आंदोलनाची दखल न घेतल्याने येणाऱ्या काळात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा समाजातर्फे देण्यात आला आहे.लिंगायत समाजाला अल्पसंख्याकांचा दर्जा द्यावा, या समाजाचा ‘ओबीसी’मध्ये समावेश करावा. तसेच या समाजाला स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता मिळण्यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे शिफारस करावी, आदी मागण्यांसाठी गेल्या काही महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे; परंतु सरकारने याकडे दुर्लक्ष केले आहे. याच्या निषेधार्थ मध्यरात्री बारापासून आज सायंकाळी साडेपाचपर्यंत राज्यातील लिंगायत समाज बांधवांनी मागण्यांचे मेल मुख्यमंत्र्यांच्या ई मेल आयडीवर केले. रात्री बारापासून हे मेल धडकत होते. अखेर सायंकाळी साडेपाच वाजता मुख्यमंत्र्यांचा मेल बॉक्सच ब्लॉक झाला. ही बातमी सोशल मीडियाच्या माध्यमातून झळकली. १ लाखांहून अधिक मेलमधील ८७ हजार ४२३ मेल हे पुण्यातून करण्यात आले. या ठिकाणी राज्यभरातील समाजबांधवांचे मेल आयडींचे सेंट्रलायझेशन केले होते. तसेच उरलले मेल हे थेट ज्या-त्या शहरातून व गावातून पाठविण्यात आले. लाखभर मेल जाऊन मेल आयडी ब्लॉक झाला तरी मुख्यमंत्र्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याने येणाऱ्या काळात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा लिंगायत समाज समितीने केला आहे.
मुख्यमंत्र्यांचा मेल आयडी केला ‘ब्लॉक’
By admin | Updated: July 29, 2014 00:46 IST