कोल्हापूर : गेल्या २३ वर्षांची आंदोलनाची पार्श्वभूमी लाभलेल्या आणि कोल्हापूर शहरवासीयांच्या दृष्टीने महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेच्या कामाच्या भूमिपूजन समारंभास उपस्थित राहण्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण उद्या, मंगळवारी सायंकाळी पावणे सहा वाजता कोल्हापुरात येत आहेत. त्यांच्या सोबत पालकमंत्री तथा सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील हेही असणार आहेत. मुख्यमंत्री चव्हाण शासकीय विमानाने ५ वाजून ४५ मिनिटांनी कोल्हापूरच्या विमानतळावर येणार आहेत. त्यानंतर ते थेट पुईखडी येथे होणाऱ्या काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेच्या भूमिपूजन समारंभस्थळी जाणार आहेत. सायंकाळी ६.३० ते ७.३० यावेळेत हा समारंभ होईल. त्यानंतर मुख्यमंत्री रात्री आठ वाजता संभाजीनगर जवळ असणाऱ्या निर्माण चौकालगतच्या मैदानावर होणाऱ्या वचनपूर्ती मेळाव्यास उपस्थित राहतील. रात्री दहा वाजता गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांच्या कसबा बावडा येथील निवास्थानी भोजनास जाणार आहेत. रात्री शासकीय विश्रामगृहावर त्यांचा मुक्काम असेल. बुधवारी (२७ आॅगस्ट) सकाळी ७.४५ वाजता शासकीय विमानाने मुंबईला मुख्यमंत्र्यांचे प्रयाण होणार आहे. संपूर्ण दौऱ्यात मुख्यमंत्र्यांसोबत पालकमंत्री हर्षवर्धन पाटील असणार आहेत. (प्रतिनिधी)कार्यक्रमाबाबत नगरसेवकांतही नाराजी महानगरपालिकेच्या इतिहासातील सर्वात मोट्या खर्चाची योजना मंजूर झाल्यानंतर त्यांच्या कामाचा शुभारंभही मोठ्या दणक्यात व्हावा. शहरात गुढ्या उभारून आनंदोत्सव साजरा केला जावा, असा काही नगरसेवकांचा इरादा होता; परंतु कार्यक्रमाचे नियोजन करण्यापासून कोणत्याही प्रक्रियेत नगरसेवकांना सामील करून घेतले नसल्यामुळे नगरसेवक नाराज झाले आहेत. दोन-चार नगरसेवकच पुढाकार घेऊन कार्यक्रमाचे नियोजन करीत असल्याने अन्य नगरसेवकांना कोण प्रमुख पाहुणे येणार, कार्यक्रम कोठे होणार, नगरसेवकांची जबाबदारी काय, हे देखील माहीत नव्हते. याबाबत काही नगरसेवकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. कार्यक्रमास जायचे की नाही, यावर आता विचार केला जात आहे.
मुख्यमंत्री सायंकाळी येणार कोल्हापुरात
By admin | Updated: August 26, 2014 00:16 IST