सांगली : महाराष्ट्र शासनाच्या सुकन्या योजनेचा आधार घेऊन पणजीतील एका कंपनीने जिल्ह्यातील काही तरुणांना बोगस पत्रे पाठवून त्यांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत फसवणूक झालेल्यांनी पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल कराव्यात, असे आवाहन जिल्हा परिषदेतील महिला आणि बालकल्याण विभागाने केलेले आहे.महाराष्ट्र शासनाची सुकन्या योजना प्रामुख्याने ग्रामीण भागात सर्वपरिचित आहे. या योजनेचा लाभ घेऊन तरुणांची फसवणूक करण्यासाठी पणजीतील एका कंपनीने जिल्ह्यातील काही तरुणांना महाराष्ट्र शासनाचे बोधचिन्ह वापरुन एक पत्र पाठविण्यास प्रारंभ केला आहे. साहजिकच तरुणांचा कंपनीने पाठविलेल्या पत्रावर विश्वास बसतो. त्यामध्ये आमच्या कंपनीत सहभागी होऊन सुकन्या योजनेचा प्रसार करा, या स्वरुपाचा मजकूर असतो. तसेच कंपनीत काम करण्यासाठी प्रारंभी ठराविक रक्कम भरण्याचे आवाहन देखील केलेले असते. बेकार तरुण आपल्याला कंपनीत नोकरी लागेल, या आशेने कंपनीने सांगितलेली रक्कम कंपनीकडे जमा करीत आहेत. जिल्ह्यातील तेरा तरुणांनी महिला आणि बालकल्याण विभागाशी संपर्क साधल्याने ही बाब उघडकीस आली. तुंग येथील एकाने पणजीतील या कंपनीत चाळीस हजार रुपये गुंतविले आहेत. पोलिसांनी तपास करुन तोतया अधिकाऱ्यांना जेरबंद करावे, अशी मागणी फसवणूक झालेल्यांकडून होत आहे. (प्रतिनिधी)
सुकन्या योजनेच्या नावाखाली फसवणूक
By admin | Updated: July 31, 2014 23:24 IST