कोल्हापूर : ‘सर्वसाधारण महिला प्रवर्गा’साठी राखीव झालेल्या सदर बाजार प्रभागात निवडणुकीच्या रिंगणात सहा उमेदवार उतरले आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, ताराराणी आघाडी आणि बसपकडून निवडणूक लढविणारे उमेदवार हे विविध समाजाचे प्रतिनिधित्व करत आहेत. त्यामुळे मतांची विभागणी निश्चित असल्याने लढती चुरशीने होणार असल्याचे दिसत आहे.हा प्रभाग यंदा वीस वर्षांनंतर ‘सर्वसाधारण महिला’साठी आला आहे. प्राथमिक शिक्षण मंडळाचे सभापती महेश जाधव यांच्या पत्नी स्नेहल जाधव या राष्ट्रवादी काँग्रेसकडून रिंगणात उतरल्या आहेत. माजी नगरसेविका मंगला ठोकळे यांच्या स्नुषा शिवानी ठोकळे या काँग्रेसच्या तिकिटावर लढत आहेत. ताराराणी आघाडीकडून स्मिता माने, शिवसेनेकडून अख्तरबी बेपारी आणि बहुजन समाज पार्टीकडून प्रियांका कांबळे लढत आहेत. अपक्ष म्हणून वैशाली दळे लढत देत आहेत. गेल्यावेळी महेश जाधव हे ‘राष्ट्रवादी’कडून निवडून आले होते. त्यावेळी त्यांना राजेश लाटकर, मंगला ठोकळे, प्रवीण कोडोलीकर, आदींची मदत झाली होती. यंदा मात्र लाटकर वगळता इतरांनी जाधव यांच्याविरोधात भूमिका घेतली आहे. त्यातील काहींनी ताराराणी आघाडी आणि काँग्रेसला बळ देण्याचे ठरविले आहे. ‘राष्ट्रवादी’च्या उमेदवार स्नेहल जाधव या पती महेश यांनी केलेल्या सव्वा कोटींची विकासकामे घेऊन मतदारांपर्यंत पोहोचत आहेत. शिवानी ठोकळे यांचा प्रभागाच्या विकासाच्या योजना मांडत प्रचार सुरू आहे. ‘ताराराणी आघाडी’च्या स्मिता माने विकासासाठी मतदारांना साद देत आहेत. बेपारी समाजातील खुदबुद्दीन बेपारी यांच्या नातलग अख्तरबी बेपारी, बसपच्या प्रियांका कांबळे व अपक्ष वैशाली दळे या आपआपल्या भूमिका मांडत लढत देत आहे.
बदललेली समीकरणे महत्त्वाचा फॅक्टर
By admin | Updated: October 20, 2015 00:16 IST