कोल्हापूर : महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी सरकार सत्तेवर येऊन वर्ष उलटले, तरी येथील सीपीआर आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अभ्यागत मंडळाच्या अध्यक्षपदी आधीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हेच असल्याने संभ्रम निर्माण झाला आहे. सदस्यांमध्येही तत्कालीन आमदार राजेश क्षीरसागर आणि अमल महाडिक यांचाही समावेश आहे. तसा फलक अजूनही अधिष्ठाता यांच्या कार्यालयाकडे जाताना झळकत आहे.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय या दोन्ही आरोग्य संस्थांच्या दैनंदिन कामकाजासाठी धोरणात्मक निर्णय घेताना सोयीचे व्हावे यासाठी २८ ऑगस्ट २०१५ च्या शासन आदेशानुसार अभ्यागत मंडळाची स्थापना करण्यात आली. तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे या मंडळाचे अध्यक्ष नेमण्यात आले, तर तत्कालीन आमदार राजेश क्षीरसागर, आमदार अमल महाडिक यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली. तसेच अजित गायकवाड, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, शीतल सुभाष रामुगडे, डॉ. सुरेखा नरेंद्र बसरगे, डॉ. इंद्रजित काटकर, डॉ. अजित लोकर, सुनील लक्ष्मण करंबे व अन्य प्रशासकीय अधिकारी असे हे १५ जणांचे मंडळ नेमण्यात आले.
या मंडळाची बैठक घेऊन या दोन्ही आरोग्य संस्थांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करण्यात आला. मंडळाच्या स्थापनेनंतर तत्कालीन पालकमंत्री पाटील यांच्या नेतृत्वाखाली अगदी कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनापासून ते सीपीआरला वैद्यकीय उपकरणांचा पुरवठा करण्यापर्यंत अनेक निर्णय घेण्यात आले. मात्र आता सतेज पाटील पालकमंत्री होऊन वर्ष झाले आणि राजेंद्र पाटील-यड्रावकर आरोग्य राज्यमंत्री होऊन वर्ष झाले, तरी हे मंडळ अजूनही बदललेले नाही.
चौकट
कोरोनाचे सोयीस्कर कारण
कोरोनामुळे हे अभ्यागत मंडळ बदलण्यास विलंब झाल्याचे कारण आता सांगितले जाईल. परंतु कोरोनाच्या संसर्गाचे प्रमाण कमी होऊनही तीन महिने होऊन गेले, तरी हे अभ्यागत मंडळ बदलण्यासाठी कोणत्याच हालचाली झालेल्या नाहीत. यापुढच्या काळात या दोन्ही संस्थांचे कामकाज आणखी सुरळीत राखण्यासाठी हे मंडळ बदलले जाणार, की जुन्यांचेच मंडळ फलकावर राहणार, याचा निर्णय घ्यावा लागेल.
०५०१२०२१ कोल सीपीआर ०१
सीपीआर आणि शासकीय वैदयकीय महाविद्यालयाचे अभ्यागत मंडळ तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याच अध्यक्षतेखाली असल्याचा हा फलक अधिष्ठाता कार्यालयाजवळ लावण्यात आला आहे.