मंगळवारपासून सुरू झालेल्या पावसाने गुरुवारी व शुक्रवारी पुन्हा झोडपून काढले आहे. त्यामुळे सखल भागात पाणी साचून अनेक परिसर जलमय झाले होते.
पाटणे फाटा ते तिलारी मार्गावर पाटणे येथील पुलावर पाणी आल्याने तो मार्ग बंद होता, तसेच चंदगडहून तिलारीला जाताना ताम्रपर्णी नदीला चंदगडजवळ पूर आल्याने ही वाहतूक ही ठप्प होती, तसेच कोवाडकडे जाणाऱ्या मार्गावर माणगाव पूल, घुलेवाडीचा ओढा, निट्टूरसह कोवाड मध्ये पुराचे पाणी शिरले आहे. ढोलगरवाडीजवळील ओढ्यावरील पाणी अद्याप कमी झाले नाही, तसेच तांबूळवाडीनजीकच्या ओढ्यावरही पाणी आल्याने हा मार्ग बंद होता. कोनेवाडीच्या पुलावरही ५ फूट, तर हल्लारवाडी पुलावर ७ ते ८ फूट पाणी होते. हलकर्णी गावाजवळील ओढ्यावर पाणीच पाणी होते. शिनोळीकडून तुडीयेकडे जाणाऱ्या मार्गावर शिनोळी, कुद्रेमणीजवळील ओढ्यावर पाणी आले होते, तसेच दुंडगे पुलावरही पाणी आल्याने हा मार्गही बंद होता.
५० वर्षांतील पहिली घटना
अडकूर पुलावरून पाणी गेल्याने
आजवर तालुक्यात अनेक वेळा महापूर आले; पण अडकूरच्या पुलावरून पाणी जाण्याची गेल्या ५० वर्षांतील पहिलीच घटना असल्याने अनेकांनी हा पुराचा आनंद घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती. घटप्रभा धरणातून गुरुवारपासून घटप्रभा नदीमध्ये १५ हजारांहून जास्त क्युसेक विसर्ग सुरू असून, त्यात शुक्रवारी पावसाचा धुमाकूळ यामुळेच अडकूर पुलावरून पाणी पडले. अडकूर येथे अनेकांच्या घरात पाणी शिरले.
तालुक्यात अनेक घरांची पडझड झाली असून, मोठे नुकसान झाले आहे.
फोटो कॅप्शन
दाटेजवळ बेळगाव-वेंगुर्ले रस्त्यावर पाणी असल्याने वाहतूक बंद होती.
ताम्रपर्णी नदीला पूर आल्याने कोवाड बाजारपेठत पाणी शिरले होते.
पाटणेजवळील पुलावर पाणी आल्याने हा मार्गही बंद होता.