इचलकरंजी : महाराष्ट्रात शरद पवार व पृथ्वीराज चव्हाण हे दोन्ही नेते एका बाजूला होऊन त्यांनी अडथळा आणला तरी आता नरेंद्र मोदींचा विकासरथ कोणीही थांबवू शकणार नाही. दोन्ही कॉँग्रेसजनांना पराभवाची जाणीव झाल्यानेच त्यांनी जातीयवादाचा विखारी प्रचार सुरू केला आहे, अशी टीका केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी केली.येथील घोरपडे नाट्यगृह चौकात भाजपचे उमेदवार सुरेश हाळवणकर यांच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या सभेत गडकरी बोलत होते. राज्यात भाजपची एकहाती सत्ता आणि इचलकरंजीत सुरेश हाळवणकर यांना निवडून दिले, तर इचलकरंजीत स्पेशल टेक्स्टाईल झोन साकारणार असल्याची घोषणा केंद्रीय मंत्री गडकरी यांनी केली.गडकरी म्हणाले, आम्ही जातीयतेचे कोणतेही राजकारण केलेले नाही. याबाबत बोलताना नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे, मी जरी मागासवर्गीय असलो, तरी तो प्रचाराचा मुद्दा करायचा नाही. आपणाला जनतेची प्रगती व विकास साधायचा आहे आणि प्रचाराचा तोच मुद्दा करून जनतेसमोर जायचे आहे. कॉँग्रेसच्या इंदिरा गांधींपासून आता राहुल गांधींपर्यंत गेल्या तीन पिढ्या ‘गरिबी हटाव’चा नारा दिला जात आहे; पण गरिबांवरील त्यांचे प्रेम नाटकी आहे. प्रत्यक्षात कोणाचीही गरिबी हटली नाही. गडकरी म्हणाले, मोदी सरकारने देशाचा विकास सुरू केला असून, केंद्र सरकारच्या पूल, रस्ते या योजनेतील कमी किमतीची टेंडर मंजूर करून देशाच्या तिजोरीतील जनतेचे करोडो रुपये आम्ही वाचविले आहेत. शंभर दिवसांत खूप काही साध्य करून दाखविले आहे. हळूहळू जनतेला विकास दिसू लागेल. दरम्यान, महाराष्ट्र मराठा संघर्ष समितीचे सुरेश पाटील, डॉ. शरद पाटील, दीपक रावळ, शरद कांबळे, सुभाष मालपाणी, आदींसह काही प्रमुखांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी कर्नाटकातील भाजपच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा आमदार शशिकला ज्वोल्ले, माजी नगराध्यक्षा मेघा चाळके, जयवंत लायकर, उदय बुगड, हिंदुराव शेळके, अजित जाधव यांची भाषणे झाली. यावेळी खासदार राजू शेट्टी, खासदार संजय पाटील, आमदार चंद्रकांत पाटील, आरपीआयचे श्रीनिवास कांबळे, दीपक भोसले, जिल्हा परिषद सदस्या विजया पाटील, देवानंद कांबळे, नगरसेवक-नगरसेविका, भाजपचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)
काँग्रेसकडून जातीयवादी प्रचार : नितीन गडकरी
By admin | Updated: October 6, 2014 23:42 IST