लोकमत न्यूज नेटवर्क
बांबवडे : बांबवडे (ता. शाहूवाडी) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन सुविधा बंद असल्याने मृतदेहाची हेळसांड होते. त्याचप्रमाणे दुखात असलेल्या नातेवाइकांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
बांबवडे प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत १८ गावे व त्याच्या दुप्पट वाड्या-वस्त्यांचा समावेश होतो. एवढा मोठा कार्यभार असताना या केंद्रात गरजेच्या सुविधा बंद आहेत. त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. बांबवडे व परिसरातील गावांमधून कोल्हापूर रत्नागिरी महामार्ग जातो. वारंवार या मार्गावर अपघात होतात, तसेच परिसरातील गावांमध्ये सर्पदंश, झाडावरून व बांधावरून पडून मृत्यू , शॉक लागून, तसेच आत्महत्या केलेले अनेक मृतदेह शवविच्छेदनासाठी या केंद्रामध्ये दाखल केले जातात.
मात्र, सध्या केंद्रात शवविच्छेदनाची सुविधा बंद आहे. या केंद्रावर लोकसंख्येचा अधिक भार असल्याने येथे कायमस्वरूपी एमबीबीएस वैद्यकीय अधिकाऱ्याची नेमणूक करणे गरजेचे आहे. या केंद्रात कायमस्वरूपी शवविच्छेदन करणारा प्रशिक्षित मदतनीसही उपलब्ध नाही. त्यामुळे लोकांची गैरसोय होते.
तेथे सुविधा बंद असल्याने मृतदेह मलकापूर ग्रामीण रुग्णालयात पाठवले जातात. तेथेही बांबवडे पेक्षा जास्त गावांचा कार्यभार असल्याने तेथेही शवविच्छेदनाची प्रक्रिया लवकर पूर्ण होत नाही. नातेवाइकांना पाच- सहा तास ताटकळत बसावे लागते. त्यामुळे बांबवडे येथे शवविच्छेदनाची सुविधा उपलब्ध करावी, अशी मागणी होत आहे.
कोट
बांबवडे प्राथमिक आरोग्य केंद्राचे मोठे कार्यक्षेत्र पाहता या ठिकाणी कायमस्वरूपी एमबीबीएस डॉक्टरांची नेमणूक झालेली असून, प्रशिक्षित मदतनीस उपलब्ध करून येथे परत शवविच्छेदन सुविधा सुरळीत सुरू करू.
-डॉ. एच.आर. निरंकारी,
तालुका आरोग्य अधिकारी, शाहूवाडी