रविंद्र हिडदुगी - नेसरी , कोणतीही कल्पना नाही, फोन नाही, पण आपल्या २१ दिवसाच्या कैलास मानसरोवर यात्रेतील यात्रेकरूंची झालेली दोस्ती आणि त्यांना भेटायला येण्याचा दिलेला शब्द एका मोठ्या अधिकाऱ्याने सत्यात उतरविला. हे अधिकारी इंडो तिबेट बॉर्डर फोर्सचे कॅप्टन असून हिमाचल प्रदेशमधील या अधिकाऱ्याचे नाव आहे वीरवर्त निगी. कॅप्टन निगी यांनी हंदेवाडी (ता. आजरा) येथील प्रकाश बाबूराव जाधव यांन घरी येवून भेटल्याने त्यांच्या आनंदाचा पारावर उरला नाही. निगी घरी येताच जाधव यांच्या कुटुंबियांनी मोठे स्वागत केले. हंदेवाडी येथील प्रकाश जाधव यांचा पोल्ट्री फिडस्चा नेसरीजवळ कारखाना आहे. कैलास मानसरोवर यात्रेसाठी त्यांची भारत सरकार कोट्यातून निवड झाली होती. गत १२ जून ते १३ जुलै २०१४ अखेर त्यांनी ही यात्रा यशस्वीरित्या पूर्ण केली. दिल्ली ते मानसरोवर परत दिल्ली असा २१ दिवसाच्या प्रवासासाठी देशातील ५४ यात्रेकरूंची निवड झाली होती. पैकी जाधव हे महाराष्ट्रातून एकमेव होते. या ५४ यात्रेकरूंच्या बॅचचे प्रमुख म्हणून कॅप्टन निगी यांची (भारत सरकार) परराष्ट्र मंत्रालयाने नियुक्ती केली होती. या २१ दिवसांच्या यात्रेत निगी यांनी सर्व यात्रेकरूंना चांगली वागणूक देण्याबरोबरच त्यांच्यात मिळून-मिसळून वागल्याने ते आमचे अधिकारी आहेत हे सर्वजण विसरून गेले. तसेच या पहिल्या बॅचचे अधिकारी किंवा लिडर म्हणून वावरलेच नाहीत. अशातच प्रकाश जाधव यांच्याशी त्यांची गट्टी जमली. विश्रांतीच्या क्षणी त्यांनी त्यावेळी हिंदी भाषेत बेळगाव येथे आल्यानंतर ‘जाधवसाब आपके गाँव जरूर आऊंगा’ असा शब्द दिला होता. पण असे शब्द कितीजण पाळतात असा जमाना असताना शनिवारी कॅप्टन निगी यांनी हंदेवाडी येथे प्रत्यक्ष जाधव यांना सरप्राईज दिली. यावेळी त्यांच्यासोबत स्टेनगनधारी बॉडीगार्ड असल्याने त्यांना पाहण्यासाठी गर्दी जमली. तात्काळ प्रकाश जाधव आले व आपल्या गावी घेवून गेले. हंदेवाडी गावी त्यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. पुरणपोळीचे जेवण त्यांना खूप आवडल्याचे सांगितले. जाधव कुटुंबियांशी थोड्या गप्पा मारून ‘अगली बार जरूर आऊँ गा’ असे सांगत पुन्हा बेळगावकडे रवाना झाले. कॅप्टन निगी यांच्या अकस्मिक येण्याने हंदेवाडी ग्रामस्थ मात्र अचंबित झाले होते.
कॅप्टन नेगींच्या भेटीने हंदेवाडीवासिय भारावले
By admin | Updated: July 27, 2014 23:06 IST