लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : नंदवाळ (ता. करवीर) येथील गट क्रमांक ६३ मधील भारत बटालियनला दिलेल्या जागेचा आदेश रद्द करून प्रतिपंढरपूर असलेल्या ‘नंदापूर’च्या विकासासाठी ती द्यावी, अशी मागणी करवीरचे माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी अप्पर जिल्हाधिकारी किशोर पवार यांच्याकडे केली. जिल्ह्यातील वारकऱ्यांच्या भावना तीव्र आहेत, त्याचा विचार करून जागेचा आदेश रद्द करावा, अन्यथा उग्र आंदोलन उभे करू, असा इशाराही त्यांनी दिला.
नंदवाळ येथील ४६ हेक्टर जमीन भारत बटालियनला दिली आहे, याबाबत चंद्रदीप नरके यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे तक्रार केली होती, त्यानुसार संबंधित जागेचा अहवाल मुख्यमंत्र्यांनी मागवला आहे. याबाबत ग्रामस्थांनी अप्पर जिल्हाधिकार पवार यांच्याकडे शुक्रवारी आपले म्हणणे सादर केले.
चंद्रदीप नरके म्हणाले, भारत बटालियनने हातकणंगलेसह इतर तालुक्यात जागा बघितल्या होत्या. मग नंदवाळ देवस्थान शेजारीलच जागा का देण्यात आली. आषाढी एकादशीला लाखो, तर दर एकादशीला हजारो भाविक दर्शनासाठी येथे येतात. या जागेवर वाहनतळ, रिंगणसोहळा, भक्तनिवास, व्यापारी निवास, नगर उद्यान आदी गोष्टी करायच्या असताना ही जागा भारत बटालियनला देऊन काेणाला काय साध्य करायचे आहे.
करवीरचे माजी सभापती राजेंद्र सूर्यवंशी म्हणाले, लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या नंदापूरमध्ये कोणी चुकीच्या पध्दतीने काम करत असेल, तर खपवून घेणार नाही. प्रसंगी काम बंद पाडू, मात्र मागे हटणार नाही.
जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाबासाहेब देवकर म्हणाले, वारकरी संप्रदायाच्या भावना तीव्र आहेत, त्यामुळे ही जागा ताब्यात घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही. टोलप्रमाणे रस्त्यावरची लढाई करावी लागली, तरी बेहत्तर मात्र थांबणार नाही. भाजपचे तालुकाध्यक्ष हंबीरराव पाटील म्हणाले, वारकऱ्यांचा अवमान सहन करणार नाही. या जागेचा आदेश रद्द केला नाही, तर उग्र आंदोलन उभारू. यावेळी सरपंच अस्मिता कांबळे, उपसरपंच सागर गुरव, पोलीसपाटील विनायक उलपे, सचिन शिंदे, सागर पाटील, धनाजी उलपे आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री वाकऱ्यांच्या भावनेचा आदर करतील
राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे विठ्ठल भक्त असल्याने त्यांनी आपण पत्र दिल्यानंतर तातडीने अहवाल मागवला. त्यामुळे ते वारकऱ्यांच्या भावनेचा निश्चित आदर करतील. जिल्हाधिकाऱ्यांनीही ग्रामस्थांच्या भावनेचा आदर करून त्याप्रमाणे अहवाल सादर करावा, असे नरके यांनी सांगितले.