लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या संपाला पाठिंबा देण्यासाठी उपोषणाला बसलेल्या मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांवर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात मृत झालेल्या सहा शेतकऱ्यांसह सोलापूर जिल्ह्यातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याला किसान सभेच्यावतीने गुरुवारी सायंकाळी शहरातून ‘कॅँडल मार्च’ काढून आदरांजली वाहण्यात आली. यावेळी शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याची मागणी करण्यात आली.बिंदू चौकातील महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर ‘एआयएस’च्या आरती रेडेकर यांच्या हस्ते मेणबत्ती प्रज्वलित करून पोलिसांच्या गोळीबारात मृत पावलेल्या शेतकऱ्यांना व आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांना काही काळ स्तब्ध राहून श्रद्धांजली वाहण्यात आली. यानंतर ‘भाकप’चे जिल्हा सचिव सतीशचंद्र कांबळे, आॅल इंडिया यूथ फेडरेशनचे राष्ट्रीय सदस्य गिरीश फोंडे यांच्या नेतृत्वाखाली कॅँडल मार्चला सुरुवात झाली. यावेळी ‘शेतकरी एकजुटीचा विजय असो’...‘शेतकऱ्यांना आत्महत्या करायला लावणाऱ्या फडणवीस सरकारचा निषेध असो’, ‘स्वामिनाथन आयोगाची ताबडतोब अंमलबजावणी करा’, ‘धनाजी जाधव अमर रहे’... ‘सर्व हुतात्मा शेतकरी अमर रहे’... ‘शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे’... ‘किसान सभेचा विजय असो’... अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. शिवाजी रोडवरून छत्रपती शिवाजी चौक येथे आल्यानंतर कॅँडल मार्चचा समारोप करण्यात आला.यावेळी सतीशचंद्र कांबळे, गिरीश फोंडे, कॉ. अनिल चव्हाण, आशा कुकडे यांची भाषणे झाली. यावेळी विकास जाधव, प्रशांत आंबी, सुनीता अमृतसागर, स्नेहल कांबळे, सीमा पाटील, किशोर आलासे, सुंदर देसाई, शक्ती कांबळे, कृष्णा पानसे, सुनील कोळी, निवास मोरे, आदी सहभागी झाले होते.
‘कॅँडल मार्च’ने मृत शेतकऱ्यांना आदरांजली
By admin | Updated: June 9, 2017 00:09 IST