दानोळी : दानोळी (ता. शिरोळ) येथे शुक्रवारी भरदुपारी दोन ठिकाणी घरफोडीची घटना घडली. माळवाडी येथील बाळासाहेब महादेव मस्कर यांच्या घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी तिजोरीतील चार हजारांची रोकड व सात तोळे सोन्याचे दागिने असा ऐवज लंपास केला, तर अमर शंकर इंगळे यांच्या घरात प्रवेश करून अज्ञात चोरट्यांनी २२०० रुपयांची रोकड व दीड तोळ्याचे गंठण लंपास केले. या घटनेची नोंद रात्री उशिरापर्यंत जयसिंगपूर पोलिसांत दाखल करण्याचे काम सुरू होते.
याबाबत अधिक माहिती अशी, बाळासाहेब मस्कर यांच्या बंद घराचे कुलूप उचकटून चोरट्यांनी आत प्रवेश केला. घरातील तिजोरातील चार हजारांची रोकड, अर्धा तोळ्याच्या दोन अंगठ्या, एक तोळ्याची चेन, साडेचार तोळ्यांच्या पाटल्या, लहान अंगठ्या, पैंजण असा एकूण सात तोळ्यांचा जिन्नस चोरट्यांनी लांबविला तर अमर इंगळे यांच्या घरात प्रवेश करून अज्ञात चोरट्यांनी २२०० रुपयांची रोकड व दीड तोळ्याचे गंठण लांबविले. घटनास्थळी जयसिंगपूरचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांनी पाहणी करून पंचनामा केला. यावेळी ठसेतज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. यावेळी पोलीस कर्मचारी सागर मगदूम, शशिकांत भोसले, रोहित डवाळे, सागर सूर्यवंशी, अमोल अवघडे, संदेश शेटे, सौरभ कांबळे, अक्षय घाटगे उपस्थित होते. या घटनेची नोंद रात्री उशिरापर्यंत नोंद करण्याचे काम सुरू होते.
फोटो - १७०९२०२१-जेएवाय-०८
फोटो ओळ - दानोळी (ता. शिरोळ) येथे अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून तिजोरीतील रकमेसह दागिने लंपास केले.