रमेश सुतार
बुबनाळ : शिरोळ तालुक्यामधील बुबनाळ, आलास ते मंगावती हद्दीपर्यंत कृष्णा नदीकाठी बेसुमार माती उपसा सुरू आहे. यासाठी माती मालकांनी एजंटांची नेमणूक केली असून, हे एजंट खुलेआमपणे १ गुंठ्याला १ लाख २० रुपये मालकाला देऊन करार करत आहेत. या बेकायदेशीर माती उपशामुळे भविष्यात पुराचे पाणी थेट गावामध्ये पोहोचणार असून, नदीचे पात्र बदलण्याची शक्यता आहे.
२०१९ नंतर आलेला महापूर, त्यानंतर आलेले कोरोनाचे संकट व त्यानंतर परत आलेला महापूर यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. यामुळे अनेकांनी आपला मोर्चा माती उपसा करण्याकडे वळवला आहे. आपल्याला जादा माती मिळावी, याकरिता वीटभट्टी मालकांनी गावामध्ये ठिकठिकाणी एजंट नेमले आहेत. हे एजंट जमीन मालकाला गाठतात आणि गुंठ्याला १ लाख २० हजार रुपये देतो, करार करून द्या, असे सांगून करार करत आहेत. मुळातच माती लागणाऱ्या मालकाकडून ते १ लाख ४० हजार रूपये घेतात आणि जमीनमालकाला मात्र १ लाख २० हजार रूपये देतात. प्रतिगुंठ्याला एजंटांच्या खिशात २० हजार रुपये विनासायास पडत असल्याचे चित्र आहे.
बुबनाळ ते आलास मंगावती परिसरात एजंटांचे प्रस्थ वाढले आहे. शेतजमीन मालकाबरोबर करार करताना १६ फुटांपर्यंत माती काढणार, अशी अट घालण्यात येत असल्याचे समजते. मुळातच शासकीय नियमानुसार तीन फुटाच्या खाली कोणालाही खोदकाम करता येत नाही, असे असताना नियम धाब्यावर बसवून खोदकाम करण्याची अट करारपत्रात घालून शेतकऱ्यांना अडचणीत आणण्याचे काम हे एजंट करत असल्याची चर्चा आहे.
........
तहसीलदारांनी लक्ष द्यावे
तीन फुटाच्या खाली खोदकाम झाल्यास महसूल प्रशासनाकडून शेतकऱ्याला जबाबदार धरून सातबाऱ्यार बोजा चढणार असून, शेतकरीच अडचणीत येणार आहे. शिरोळच्या तहसीलदारांनी अशाप्रकारे माती उपसा करण्यास परवानगी देऊ नये, अशी मागणी बुबनाळ, आलास, मंगावती परिसरातील शेतकरी करत आहेत.
फोटो – 25092021-जेएवाय-03
फोटो ओळ – कृष्णा नदीकाठालगत जेसीबीच्या सहाय्याने माती उपसा सुरु आहे.