अतुल आंबी- इचलकरंजी --शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी, यासाठी आवश्यक असलेले मुख्य चौकांमधील सिग्नल दुरुस्त करण्याचे काम नगरपालिकेने सुरू केले आहे. पंधरा दिवसांत शहरातील तीन ठिकाणी सिग्नल सुरू करण्यात येणार आहेत. दरम्यान, पार्किंग व्यवस्थेत सुरळीतपणा आणण्यासाठी ट्रॅव्हलर्स व मोठे सुताचे ट्रक शहराबाहेरील चौकात थांबवून रात्रीच्या वेळेत ट्रान्स्पोर्टचे काम केल्यास वाहतुकीचा व पार्किंगचा प्रश्न निकालात निघण्यास मदत होणार आहे. नगरपालिकेचे अधिकारी व वाहतूक पोलीस यांनी संयुक्तपणे याबाबतचे नियोजन करावे, अशी मागणी होत आहे.शहरातील वाहतूक व पार्किंग व्यवस्था अस्ताव्यस्त असल्यामुळे वाहनधारकांबरोबरच पादचाऱ्यांनाही नेहमीच कसरत करीत रस्त्यांवरून मार्गक्रमण करावे लागते. शहरातील मुख्य चौकांमध्ये असलेले सिग्नलही गेल्या अनेक वर्षांपासून बंद अवस्थेत आहेत. नगरपालिका अंदाजपत्रकात वाहतूक व्यवस्थेसाठी आवश्यक तरतूद केली जात नाही. अशा अवस्थेत वाहतूक शाखेचा कारभार सुरू आहे. शहरातील वाहतूक व्यवस्थेला शिस्त लागावी म्हणून साधारण दोन वर्षांपूर्वी पुणे येथील एका कंपनीमार्फत शहरात असलेले जुने सिग्नलचे दिवे काढून त्याठिकाणी नवीन एलईडी सिग्नल बसविण्यात आले. चाचणी म्हणून काही दिवस सिग्नलचा वापर सुरू करण्यात आला. मात्र, यावेळी सिग्नल चालविण्यासाठी वापरण्यात आलेली वीज थेट महावितरणच्या खांबावरून घेण्यात आली होती. ही बाब उघडकीस आल्यानंतर महावितरणने नगरपालिकेला ताकीद देत बेकायदेशीर जोडणी बंद केली आणि सिग्नल सुरू करण्याचे काम पुन्हा रखडले.याबाबत विविध सामाजिक संस्था, संघटनांनीही नगरपालिका व वाहतूक शाखेत सिग्नल सुरू करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली. त्यानंतर नगरपालिकेने शुक्रवारपासून शहरातील सिग्नल व्यवस्था सुरू करण्याचे काम नव्याने सुरू केले आहे. यामध्ये येत्या पंधरा दिवसांत प्रांत कार्यालय, जनता चौक व राजवाडा चौक येथील सिग्नल सुरू करण्यात येणार असल्याचे उपनगराध्यक्ष रणजित जाधव यांनी सांगितले.तसेच मुख्य मार्गावर उभारणाऱ्या मोठ्या ट्रॅव्हलर्स, तसेच लहान-मोठ्या रस्त्यांवर असलेल्या गोदामांसमोर कापडाच्या गाठी व सुताची बाचकी उतरविण्यासाठी व भरण्यासाठी तासन्तास उभारलेले मोठे ट्रक यांचाही प्रश्न गंभीर बनला आहे.मोठ्या वाहनांचे नियोजन गरजेचेशाळा भरण्याच्या व सुटण्याच्या वेळेला शहरातील गोविंदराव हायस्कूल, राजवाडा, पोटफाडी चौक, शिवाजीनगर, डीकेएएससी महाविद्यालय, डेक्कन चौक याठिकाणी दोन-दोन तास या मोठ्या वाहनांमुळे वाहतुकीची कोंडी होते. त्यामुळे अशा मोठ्या वाहनांना शहराबाहेरील चौकात थांबवून रात्री नऊ ते पहाटे सहापर्यंत माल भरण्याचे व उतरविण्याचे नियोजन करावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. त्याचप्रमाणे मुख्य मार्गावर मोठ्या ट्रॅव्हलर्स प्रवाशांचे साहित्य व प्रवासी बसण्यासाठी तासन्तास थांबविल्या जातात. त्यामुळेही वाहतुकीची कोंडी होते. त्यांनाही अन्य ठिकाणी पर्याय उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी होत आहे.
राधानगरीत रमजानमध्ये बंधुभाव, समतेची प्रचिती
By admin | Updated: July 12, 2015 22:47 IST