अस्सल कोल्हापुरी बाज असलेला परिसर म्हणून पद्माराजे उद्यान प्रभाग (प्रभाग क्रमांक ४९) परिचित आहे. कोल्हापूरची खास ओळख असलेल्या शिवाजी पेठ परिसराचे नेतृत्व माजी महापौर सुनीता राऊत करीत आहेत. त्यांनी आतापर्यंत कोट्यवधीचा निधी प्रभागात आणला असून, १०० टक्के कामे पूर्ण झाल्याचा दावा राऊत यांनी केला आहे. मात्र, रंकाळ्याजवळील तांबट कमान रस्ता गेली साडेचार वर्षे रखडल्याची खंत नागरिकांतून व्यक्त होत आहे.जुना वाशी नाका तरुण मंडळ, मरगाई गल्ली, खंडोबा तालीम, सरदार तालीमसमोरील परिसर, खंडोबा देवालय ते पद्माराजे उद्यान असा परिसर या प्रभागात येतो. परिसरात तीन-तीन माजी महापौर, तर २५ हून अधिक सहकारी संस्थांचे संचालक व पदाधिकारी राहतात. दिग्गज नेत्यांचा प्रभाग म्हणून या परिसराची ओळख आहे. मरगाई देवालय व प्रसाद तरुण मंडळाचा हॉल, वेताळ गार्डनची निर्मिती, खंडोबा देवालय सुशोभीकरण, साकोली कॉर्नर ते जुना वाशी नाका या एक कोटी तीस लाख रुपयांच्या रस्त्यांची बांधणी, आदी कोट्यवधींची विकासकामे केल्याचे राऊत यांनी सांगितले. पद्माराजे गार्डनमध्ये खुली व्यायामशाळा ही संकल्पना सुरू केली. विकासकामांच्या माध्यमातून माजी नगरसेवक अजित राऊत व नगरसेविका सुनीता राऊत यांचा जनसंपर्क व कामाचा धडाका याबाबत नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे. सहा महिन्यांच्या महापौरपदाच्या कालावधीतील अडीच महिने आंदोलन व निवडणुकीच्या आचारसंहितेत जाऊनही टोल आंदोलन, केएमटी, रंकाळा संवर्धन, गांधीनगर अतिक्रमण हटविण्याची मोहीम, आदी प्रश्नांवर सकारात्मक निर्णय घेत ठोस ‘अॅक्शन’ घेणाऱ्या महापौर सुनीता राऊत यांच्याबद्दल प्रभागातील नागरिक विश्वास व आदर व्यक्त करतात. मात्र, तांबट कमान रस्त्याचे काम रखडल्याने परिसरात धुळीचे साम्राज्य आहे. राजीनाम्याचे अस्त्र उगारूनही तांबट कमान रस्ता ‘जैसे थे’ असल्याची खंतही स्थानिक रहिवाशांमधून व्यक्त होत आहे. रंकाळा तलावात लवकरच बोटिंग, घनकचरा व्यवस्थापन व अत्याधुनिक कत्तलखाना उभारण्याची संकल्पना, थेट पाईपलाईन योजनेतील कामाच्या तांत्रिक बाबींची पूर्तता करून ही योजना मार्गी लावली. शाहू मिल जागेवरील शाहू महाराजांचे स्मारक, नर्सरी बागेतील समाधीस्थळाचे काम मार्गी लावण्याचा प्रयत्न, पंचगंगा प्रदूषणमुक्तीसाठी मैलाचा दगड ठरणारा कसबा बावड्यातील सांडपाणी शुद्धिकरण प्रकल्प व नालेजोड योजना ही महापौर कारकिर्दीतील सर्वांत मोठी व लक्षात राहणाऱ्या योजना ठरल्या. प्रभागातील सर्व कामे मार्गी लावली आहेत. तांबट कमान रस्ताही लवकरच पूर्ण होईल. - सुनीता राऊत, माजी महापौर
तांबट कमान रस्त्याचा डाग कायम
By admin | Updated: March 17, 2015 00:11 IST