करंजफेण : कोतोली (ता. पन्हाळा) येथील नेहरू विद्यामंदिर व ज्युनि. काॅलेज शाळेच्या १९८७-८८ सालातील दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा शाळेच्या इमारतीमध्ये तब्बल ३२ वर्षांनी पार पडला. वयोमानानुसार बदललेल्या चेहर्यामुळे अनेकांना एकमेकांच्या नावाचा विसर पडल्याचे चित्र निर्माण झाले. मात्र, एकमेकांनी जुन्या आठवणींचा संदर्भ देत पुनश्च: ओळख निर्माण करून गुरुजींच्या साक्षीने मित्रत्वाच्या प्रेमाच्या ओलाव्याने भिजत एकमेकाला दिलेले आलिंगन पाहून उपस्थितांच्या डोळ्यांच्या कडा ओल्या झाल्या. यावेळी माजी मुख्याध्यापक डी. एस. चौगले, डी. जी. पाटील यांनी आपल्या मनोगतातून जुन्या आठवणींना उजाळा देऊन निवडक कवितांच्या ओळींचा विद्यार्थ्यांच्यावर वर्षाव केला. कवितेतील शब्दांना टाळ्यांची दाद देत तीन दशकांनंतर देखील जणू वर्गच भरला असल्याची अनुभूती पाहायला मिळाली. खडतर परस्थितीवर मात करून शिक्षण पूर्ण करणार्या विद्यार्थ्यांचे यावेळी शिक्षकांनी कौतुक केले. एम. एस. पाटील, जी. डी. गायकवाड, निवृत्ती बंके, पी. एस. पोर्लेकर, बाजीराव आंगठेकर, खंडेराव खोत, आदी उपस्थित होते.
फोटो : कोतोली येथील १९८७-८८ वर्षातील दहावीतील विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या सोबत स्नेहमेळावा साजरा केला.