महिला, तरुण आणि लहान मुले या समाजातील प्रमुख घटकांच्या काही सामाजिक समस्या आहेत. त्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न या संस्थेतील कार्यकर्ते करीत आहेत.प्रथम पन्हाळा तालुक्यात मुलींच्या जन्माचे प्रमाण कमी असताना, २००७ मध्ये हेरवाड येथील ‘आधार बहुउद्देशीय सेवा संस्थे’च्या माध्यमातून पाच ते सात तरुण-तरुणींनी एकत्र येऊन स्त्री-भ्रूणहत्येविरोधात लढा उभारण्याचे ठरविले. त्यानुसार त्यांनी संपूर्ण जिल्ह्यात पथनाट्ये, पोस्टर, प्रदर्शने, कार्यशाळा, व्याख्याने अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधन सुरू केले. मात्र, एका बाजूला हे कार्य सुरू असताना नव्या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने केवळ मुलगा पाहिजे म्हणून मोठ्या प्रमाणावर स्त्री-भ्रूणहत्या सुरू असल्याचे आढळले. समाजात स्त्री-भ्रूणहत्याविरोधात दबावगट निर्माण करून व्यापक चळवळ उभी राहिली पाहिजे, या उद्देशाने स्त्री-भ्रूणहत्येविरोधी कार्य सुरू झाले. स्टिंग आॅपरेशनद्वारे गर्भलिंंग निदान व भ्रूणहत्या करणाऱ्या डॉक्टरांवर पाळत ठेवण्यास सुरुवात केली. कोल्हापूर जिल्ह्यातील स्त्री-भ्रूणहत्या करणाऱ्या व गर्भलिंंग निदान करणाऱ्या सुमारे १३ डॉक्टरांना स्टिंग आॅपरेशनद्वारे पकडून दिले. त्यांपैकी तीन डॉक्टरांना तीन वर्षांची शिक्षाही झाली असून, अन्य खटले न्यायप्रविष्ट आहेत. हे कार्य करताना असंख्य अडचणींना सामोरे जावे लागले. जिवाची पर्वा न करता संस्थेचे कार्यकर्ते लढत आहेत. स्त्री-भ्रूणहत्येच्या विरोधात लढताना धमक्यांचे फोन, जिवे मारण्यासाठी पाठलाग करणे, अशा प्रकारच्या अडचणी आल्या; तरीही नेटाने लढत राहण्याच्या जिद्दीने कार्यकर्ते कार्यरत आहेत. एवढ्यावर न थांबता पुढे अनेक शाळा, कॉलेज, गावे, वाड्या-वस्त्यांमध्ये अंधश्रद्धा, व्यसनमुक्ती, महिलांचे प्रश्न आणि कायदा, एचआयव्ही (एड्स) यांबद्दल तसेच दारूबंदी, बालकांचे प्रश्न अशा अनेक सामाजिक समस्यांवर जनजागृतीचे विविध कार्यक्रम राबविले. पुढे यातूनच संस्था, भारतीय महिला फेडरेशन व मेधा पानसरे यांच्या सहकार्यातून चळवळव्यापक केली.आजपर्यंतच्या वाटचालीमध्ये समाजातील अनेक घटकांतून सहकार्य मिळत गेले आणि मिळतही आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील विविध सामाजिक संस्था व व्यक्तींनी संस्थेला सहकार्य केले. स्त्री-भ्रूणहत्येविरोधी लढत असताना स्टिंग आॅपरेशनवेळी डॉक्टरांनी गर्भलिंग निदानासाठी मागणीकेलेली मोठी रक्कम या संस्थेचे कार्यकर्ते स्वत:च्या खिशातून देतात. अशावेळी महिला दक्षता समिती व कॉ. गोविंंद पानसरे हे देखील आर्थिक मदत देतात. शासनाकडून आजतागायत या सामाजिक कार्यासाठी आर्थिक हातभार लाभलेला नाही. संस्थेच्या माध्यमातून आजवर केलेल्या कार्याची दखल घेऊन विविध सेवा संस्थांनी संस्थेच्या अध्यक्षा ज्योती भालकर यांना पुरस्कार देऊन गौरविले आहे. तरुणांसाठी तरुण झगडतानाचे चित्र समाजात नक्कीच आदर्शवत ठरेल. - भरत बुटाले
जनजागृतीसाठी संस्थेचा श्वास
By admin | Updated: August 5, 2014 00:09 IST