कोल्हापूर : फुलेवाडी रिंग रोडवर एच. पी. पेट्रोल पंपांसमोर चौघांना चाकूने भोसकल्याप्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी अटक केलेल्या दोघांना न्यायालयाने आज, बुधवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. तलाह अस्लम शेख (वय २२, रा. आर. के.नगर), सुय्याम उमर डांगे (२५, रा. रविवार पेठ, लक्ष्मीपुरी) अशी दोघांची नावे आहेत.
फुलेवाडी रिंग रोडवर शनिवारी रात्री उशिरा काही युवकांत वादावादीचा प्रसंग घडला होता. या वेळी झालेल्या चाकूहल्ल्यात साद बागवान, राहीब बागवान, आफताब नायकवडी, राज मुजावर हे जखमी झाले होते. पोलिसांनी यापूर्वी गुन्हेगार सद्दाम कुंडले, स्वप्निल कुरणे यांना अटक करून त्यांची पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. मंगळवारी अटक केलेले संशयित शेख व डांगे या दोघांनाही न्यायालयाने पोलीस कोठडी दिली. चौघांचीही पोलीस कोठडी संपत असल्याने त्यांना आज, बुधवारी पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. अद्याप शाहरूख शिकलगार, आरबाज बागवान, जुनेर बारस्कर व मार्शल (पूर्ण नाव नाही) हे चौघे संशयित फरार आहेत.