कोल्हापूर : आगामी काळातील राजकीय लढाई ही व्यक्तिकेंद्रित नसून एका विचारसरणीची आहे. त्यामुळे महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जाताना कॉँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाने आपले सर्व व्यक्तिगत मतभेद बाजूला ठेवून एकदिलाने एकत्र येणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय कॉँग्रेस समितीचे सरचिटणीस खासदार दिग्विजय सिंग यांनी आज, बुधवारी दुपारी येथे बोलताना केले. धर्मावर आधारित द्वेषभावना निर्माण करून जातीयवादी पक्षांनी देशाला फसविले असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. करवीर तालुक्यातील दिंडनेर्ली येथे राजीव गांधी सद्भावना दौडची सांगता आणि त्यानंतर झालेल्या शेतकरी मेळाव्यात मार्गदर्शन करताना दिग्विजय सिंग बोलत होते. यावेळी राजीव गांधी चॅरिटेबल ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी यशवंतराव थोरात यांना ‘भारतरत्न राजीव गांधी सद्भावना पुरस्कार’ देऊन दिग्विजय सिंग यांच्या हस्ते गौरविण्यात आले. महाराष्ट्रात कॉँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेस आघाडी आहे. कधी-कधी त्यात बिघाडी होण्यापर्यंत मजल जाते. त्याचा फटका सगळ्यांनाच बसतो; परंतु भविष्यात अशी बिघाडी होणे दोन्ही पक्षांच्या दृष्टीने हिताचे नाही. जेथे लालूप्रसाद यादव व नितीशकुमार एकत्र येत असतील तेथे महाराष्ट्रात कॉँग्रेस व राष्ट्रवादीला एकत्र येणे आवश्यकच आहे. जर आपण एकत्र आलो नाही तर धर्मावर आधारित समाजात द्वेष पसरविणाऱ्या शक्तींचा उन्माद अधिकच वाढेल, अशी भीतीही त्यांनी यावेळी व्यक्त केली. विलासराव देशमुख, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारख्या इमानदार नेत्यांनी महाराष्ट्राच्या विकासात योगदान दिले आहे, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
दोन्ही काँग्रेसनी एकत्र राहणं हिताचं - दिग्विजय सिंग
By admin | Updated: August 21, 2014 10:37 IST