कोल्हापूर : रंकाळा तलावनजीकच्या इराणी खणीत रविवारी सायंकाळी उडी मारुन आत्महत्या केलेल्या वृद्धाचा मृतदेह सोमवारी दुपारी १२ वाजता पाण्यावर तरंगताना पोलिसांना मिळाला. बाळासाहेब तुकाराम माळी (वय ६३, रा. शिवगंगा कॉलनी, मोरे-मानेनगर, साळोखेनगर, कोल्हापूर) असे त्यांचे नाव आहे. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.
इराणी खणीत रविवारी सायंकाळी अज्ञात वृद्धाने उडी टाकली. त्याच दरम्यान विक्रमनगर येथील ललित शिंदे या तरुणाने धाडसाने पुढे होऊन पाण्यात उडी टाकून बुडणाऱ्या व्यक्तीला वाचविण्याचा प्रयत्न केला. संबंधित वृद्ध पाण्यात बुडाले. अग्निशामक दलाच्या रेस्क्यू पथकाने पाण्यात मृतदेहाच्या शोधासाठी तत्काळ मोहीम राबवली. रात्री उशिरा त्या व्यक्तीचे नाव बाळासाहेब माळी असल्याचे समजले. रात्री उशिरापर्यंत त्यांचा मृतदेह मिळाला नव्हता. सोमवारी दुपारी त्यांचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळला. अग्निशमन दलाने पोलिसांच्या मदतीने तो बाहेर काढला. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.