कोल्हापूर : शहरातील लसीकरणास मिळणारा कमी प्रतिसाद लक्षात घेऊन महानगरपालिका आरोग्य विभागाने २० ते २४ सप्टेंबर या कालावधीत अठरा वर्षांवरील नागरिकांची थेट लसीकरण केंद्रावरच नोंदणी करून घेऊन लसीकरण करण्याची मोहीम हाती घेण्यात येणार आहे.
महानगरपालिका प्रशासनाकडे कोरोना प्रतिबंधात्मक लस उपलब्ध होत आहे. शहरातील ११ लसीकरण केंद्रांवर रोज साडेपाच हजार व्यक्तींचे लसीकरण करण्याची व्यवस्था केली आहे. मात्र तितके लाभार्थी मिळत नाहीत. काही व्यक्ती ऑनलाइन नोंदणी करण्याचा प्रयत्न करीत नाहीत. त्यामुळे लसीकरणास प्रतिसाद मिळत नाही. म्हणूनच थेट लसीकरण केंद्रात येणाऱ्या अठरा वर्षांवरील व्यक्तींची नोंदणी केंद्रावरच करून त्यांचे लसीकरण केले जाणार आहे.
सोमवारपासून ही विशेष मोहीम सुरू होणार आहे. शुक्रवार, २४ सप्टेंबरपर्यंत ही मोहीम सुरू राहील. कोविशिल्डच्या डोसकरिता रोज ५०० नगरिकांना कुपन देऊन सर्व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रे तसेच भगवान महावीर दवाखाना विक्रम नगर व द्वारकानाथ कपूर दवाखाना कदमवाडी येथे लसीकरण करण्यात येणार आहे.
प्रथम येणाऱ्या नागरिकांचे प्राधान्याने लसीकरण करण्यात येणार असून, ५०० पेक्षा अधिक नागरिक लसीकरणासाठी उपस्थित राहिल्यास त्यांना कुपन देऊन दुसऱ्या दिवशी लसीकरणास बोलाविण्यात येणार आहे. नागरिकांनी लसीकरणास येताना सोबत आधार कार्ड व फोटो आयडी असलेले कोणतेही ओळखपत्र घेऊन यावे. या मोहिमेत १८ वर्षांवरील नागरिकांनी जास्तीतजास्त नोंदणी करून लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी केले आहे.