कोल्हापूर : काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेच्या भूमिपूजनासाठी कोल्हापूर दौऱ्यावर आलेले मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या वाहनावर आज, मंगळवारी सर्वपक्षीय टोल विरोधी कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी उजळाईवाडी बोगद्याजवळ काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त केला. या प्रकरणी गोकुळ शिरगाव पोलिसांनी टोल समितीतील सुमारे १३ जणांना ताब्यात घेतले आहे. या प्रकारामुळे वातावरण तंग झाले.सायंकाळी उजळाईवाडी विमानतळावर मुख्यमंत्र्यांचे आगमन झाले. येथे कार्यकर्त्यांशी त्यांनी चर्चा केली. यानंतर ते पोलिसांच्या ताफ्यामधून निघाले. पुईखडी येथे भूमिपूजन कार्यक्रमासाठी निघाले असता टोल विरोधी समितीतील कार्यकर्त्यांनी उजळाईवाडी बोगद्याजवळ काळे झेंडे दाखवत ‘टोल आम्ही देणार नाही, देणार नाही’ अशी घोषणाबाजी करत निषेध केला. यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांना पोलीस ठाण्यात आणले. याप्रकरणी संशयित नगरसेवक प्रा. जयंत पाटील, टोल समितीतील दिलीप देसाई, बाबा इंदुलकर, भगवान काटे, जयदीप शेळके, प्रसाद जाधव, उदय लाड, महेश सासने, गौरव लांडगे, प्रकाश पाटील, बाबा पार्टे, राजेंद्र गायकवाड, साहेबराव काशीद अशा १३ जणांना ताब्यात घेतल्याचे सहा. पोलीस निरीक्षक अजित त्रिपुटे यांनी सांगितले. याची नोंद गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात रात्री उशिरा झाली. (प्रतिनिधी)
मुख्यमंत्र्यांना दाखविले काळे झेंडे
By admin | Updated: August 27, 2014 00:18 IST