ज्योतीप्रसाद सावंत -- आजरा अनेक राजकीय चढ-उतार आले तरीही पक्षाशी प्रामाणिक राहून कामात राहणाऱ्या आजरा तालुक्यातील भाजपच्या प्रमुख कार्यकर्त्यांना पक्षाची सत्ता आल्यानंतर ठिकठिकाणी सन्मानाचे स्थान मिळत असल्याने खऱ्या अर्थाने भाजप कार्यकर्त्यांची पक्षनिष्ठा फळाला येत आहे.आजऱ्याच्या माजी सरपंच शुभदा जोशी यांना जिल्हा नियोजन मंडळावर संधी मिळाली आहे. आजरा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी नयन भुसारी यांची वर्णी लागली आहे. आजरा सूतगिरणीमध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते बाबूराव कुंभार हे ‘संचालक’पद भूषवत आहेत, तर भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अरुण देसाई आणि श्रीपती यादव यांना संजय गांधी निराधार योजना समितीमध्ये अनुक्रमे अध्यक्ष व अशासकीय सदस्य म्हणून स्थान मिळाले आहे. बापू टोपले राष्ट्रवादीचा वरचष्मा असणाऱ्या जनता बँकेत संचालक म्हणून काम करीत आहेत. लवकरच तालुका संघाच्या स्वीकृत तज्ज्ञ संचालकपदी भाजपचे श्रीपती यादव यांची निवड होण्याची शक्यता आहे. भविष्यात होणाऱ्या आजरा साखर कारखाना निवडणुकीतही ‘भाजप’ला जवळ करण्याशिवाय प्रमुख आघाड्यांना पर्याय नाही. मलिककुमार बुरुड, प्रा. सुधीर मुंज, माजी सरपंच जनार्दन टोपले यांनाही ठिकठिकाणी संधी देण्याच्या हालचाली सुरू आहेत. एकंदर इतर पक्षांची पडझड, अंतर्गत धुसफूस कार्यकर्त्यांच्या ‘बेडूकउड्या’ सुरू असताना आजरा येथील भाजप कार्यकर्त्यांनी मात्र स्वत:ची पतसंस्था, शैक्षणिक संस्था सांभाळत ग्रामपंचायत, सूतगिरणी, तालुका खरेदी-विक्री संघ, शासकीय समित्या, जनता बँक या प्रमुख संस्थांमध्ये आपले स्थान घट्ट करण्यास सुरुवात केली आहे. ‘एकच’ कार्यकर्ता मोठा करण्याऐवजी ‘अनेकांना’ ठिकठिकाणी दिली जाणारी संधी भाजपच्या पथ्यावर पडत आहे.‘चंद्रकांतदादांचे लक्ष’सहकारमंत्री चंद्रकांतदादा यांचा कित्येक वर्षांपासून आजरा तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांशी संपर्क आहे. मंत्री नसतानाही त्यांनी शक्य तो निधी आजरा तालुक्यातील विकासकामांना दिला आहे. त्यामुळे हक्काने भाजप कार्यकर्ते चंद्रकांतदादांशी विकासकामांकारिता ‘थेट’ संपर्क साधत आहेत, हीसुद्धा जमेची बाब ठरत आहे.
भाजपच्या कार्यकर्त्यांची पक्षनिष्ठा फळाला
By admin | Updated: September 7, 2015 22:19 IST