कोल्हापूर : येणारी महापालिकेची निवडणूक भाजप ताकदीने लढविणार आहे. प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली सर्वजण महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतील, असा विश्वास भाजपचे कोल्हापूर जिल्हा प्रभारी माजी खासदार अमर साबळे यांनी व्यक्त केला.
साबळे दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी शनिवारी कोल्हापुरात दाखल झाले. यावेळी त्यांनी छत्रपती ताराराणी पुतळा, महापालिका येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा व छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. यानंतर त्यांनी भाजप जिल्हा कार्यालयात प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. सुरुवातीला भाजप महानगर जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांनी आतापर्यंतच्या निवडणूक तयारीचा अंदाज घेतला. पश्चिम महाराष्ट्र प्रवक्ते धनंजय महाडिक म्हणाले, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून कोल्हापुरात वैद्यकीय मदत, शहर सुशोभीकरणाची कामे झाली आहेत.
देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव म्हणाले, सत्तारूढ कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसने थेट पाईपलाईन, ड्रेनेज व्यवस्था, घरफाळा घोटाळा असे अनेक विषय रखडल्यामुळे कोल्हापूरच्या विकासाला चालना मिळत नाही. साबळे हे विविध मान्यवरांशी या निमित्ताने संवाद साधणार आहेत. या बैठकीसाठी दिलीप मेत्राणी, हेमंत आराध्ये, गणेश देसाई, अजित ठाणेकर, चंद्रकांत घाटगे, संतोष भिवटे, अमोल पालोजी, सचिन तोडकर, किशोरी स्वामी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
२३०१२०२१ कोल बीजेपी ०१
कोल्हापूरचे भाजप प्रभारी माजी खासदार अमर साबळे यांनी शनिवारी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी महेश जाधव, धनंजय महाडिक, राहुल चिकोडे उपस्थित होते.