कोल्हापूर : पंचगंगा रुग्णालय येथे कोविड लसीकरणादरम्यान शिवसैनिकांनी केलेल्या सहकार्यामुळे लसीकरण शांततेत पार पडले. लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांना शिवसैनिकांतर्फे बिस्किटे व पाणी बाटल्यांचे वाटप करण्यात आले.
गेले काही दिवस बंद असलेली लसीकरण मोहीम सोमवारी पुन्हा सुरू झाली. दोन दिवसांपूर्वी पंचगंगा रुग्णालय लसीकरण केंद्रावर लस संपल्याने गोंधळ उडाला होता. त्यामुळे उत्तरेश्वर शुक्रवारपेठ शिवसेना शाखेने ही मोहीम शांततेत पार पाडण्यासाठी पुढाकार घेतला. सोमवारी पहाटे साडेचार वाजल्यापासून अनेक ज्येष्ठ नागरिक, महिला, अपंग व्यक्ती लसीकरण केंद्रावर रांगेत उभे होते.
शिवसेनेच्या वतीने नागरिकांची रांग लावणे, सोशल डिस्टन्सिंग ठेवणे, कोणतीही गडबड गोंधळ होऊ नये यासाठी मदत करणे, लसीकरण कर्मचाऱ्यांवर कोणताही दबाव येऊ नये म्हणूनच याची काळजी घेऊन रांगेत उभ्या असलेल्या अपंग व आजारी माणसांना प्राधान्याने लसीकरण करून घेणे याकरिता मदत केली.
रांगेतील सर्वच नागरिकांना शिवसेनेच्या वतीने बिस्किटे व पाणी बाटल्यांचे वाटप करण्यात आले. किशोर घाटगे, संजय देसाई, रियाज बागवान, सुरेश कदम यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी महापालिका आरोग्य कर्मचारी पोलीस प्रशासन यांच्या बरोबरीने लसीकरण व्यवस्थित पार पडण्यासाठी स्वयंसेवक म्हणून काम केले. यावेळी रईस बागवान सलमान बागवान आदी शिवसैनिक कार्यरत होते. पंचगंगा रुग्णालयातील लसीकरण केंद्रात २२९ जणांना कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस व नोंदणी केलेल्या नागरिकांनी पहिला डोस घेतला. यावेळी लसीकरण केंद्राच्या प्रमुख डॉ. रूपाली यादव उपस्थित होत्या.