कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या कोरोना लसीकरणास आरोग्य कर्मचारी तसेच महानगरपालिका कर्मचाऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळत असून लसीकरणाच्या ठरवून दिलेल्या उद्दिष्टापेक्षा ५५ टक्क्यांहून अधिक लसीकरण पूर्ण झाले आहे. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत हे प्रमाण जास्त आहे.
केंद्र सरकारने संपूर्ण देशभर कोरोना लसीकरणाची मोहीम हाती घेतली असून पहिल्या टप्प्यात आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आला होता. कोल्हापूर शहरास आरोग्य सेवेतील ११ हजार ४६१ कर्मचाऱ्यांना लस देण्याचे उद्दिष्ट ठरवून दिले होते. त्यापैकी ६ हजार ३१८ आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात फ्रंटलाइन अर्थातच महानगरपालिकेच्या ५ हजार ०४७ कर्मचाऱ्यांना लस देण्याचे उद्दिष्ट दिले होते. त्यापैकी ९२५ कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली. फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांना गेल्या पाच दिवसांपासून लस दिली जात आहे.
कोल्हापूर महानगरपालिकेतर्फे शनिवारी एका दिवसात ४१९ कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली, त्यामध्ये आरोग्य सेवेतील २१६ आरोग्य सेवेतील कर्मचारी तर २०१ महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. महापालिकेच्या पाच सेंटर्सवर लसीकरणाची मोहीम सुुरू आहे.