सदाशिव मोरे।
आजरा : घरात गुप्तधन आहे काढून देतो, विधी केल्यानंतर तुम्हाला पैसा मिळू शकेल, अंगारा लावल्यानंतर मूल होईल. दुसऱ्याने केलेली करणी काढून देतो यासह भूलथापा लावून भोंदूगिरी करणाऱ्यांचे प्रमाण आजरा तालुक्यात वाढले आहे. भोंदूगिरी करणाऱ्या बाबांच्या भावनिक आमिषाला सर्वसामान्य कुटुंबातील नागरिक बळी पडत आहेत. अनिष्ट व अघोरी प्रथांच्या माध्यमातून आर्थिक फसवणूक मोठ्या प्रमाणात होत आहे. लाखो रुपयांची लुबाडणूक करणाऱ्या बुवाबाजीवर अंकुश ठेवून अघोरी प्रथांना पायबंद घालण्याची गरज आहे. तालुक्यातील शिरसंगी येथील मामाने घरातील गुप्तधन काढून देण्याच्या भूलथापाने महिलेला फसविण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तालुक्यातील आजरा, गवसे, सोहाळे, खेडे, भादवण, उत्तूर, होन्याळी, आवंडी वसाहत, अरळगुंडी, चिमणे या परिसरात बुवाबाजीचे प्रकार वाढले असून अनिष्ठ व अघोरी प्रथांना अधिकच पाठबळ मिळत आहे. सहा वर्षांपूर्वी राज्यात जादूटोणाविरोधी वटहुकूम लागू झाला आहे. या वटहुकूमाद्वारे जादूटोणा, अनिष्ठ प्रथांद्वारे आर्थिक नुकसान व शारीरिक इजा पोहोचविणाऱ्यांना सात वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा आहे तरीही सर्वत्र भोंदूगिरीचे प्रकार राजरोसपणे सुरू आहेत.
यापूर्वी किटवडे, देवर्डे, भादवण येथील प्रकार उघडकीस आले आहेत. भोंदूबाबा भक्तगणांत भावनिकता निर्माण करून घराघरांत प्रवेश करतात व महिलांशी शारीरिक संबंध ठेवत आहेत. मात्र, अशा प्रकारची कुठेही चर्चा केली जात नाही. त्यामुळे भोंदूगिरी बोकाळण्यास मदत होत आहे.
-----------------------------
* रामतीर्थवरील अमावस्येची रात्र आणि भोंदूगिरी
अमावस्येची रात्री बारा वाजता आजऱ्याजवळील भोंदूबाबा रामतीर्थ मंदिरासमोर आंघोळ करून महादेव मंदिरात भक्तांच्या अडचणीवर मार्ग काढतो. गेली अनेक वर्षे हा प्रकार राजरोसपणे सुरू आहे. पण, यावर समाजातील कोणीही बोलण्यास तयार नाही. रविवारच्या दिवशी तर या भोंदूबाबाजवळ भाविकांची प्रचंड गर्दी असते.
----------------------------
* पोलिसांना कारवाईसाठी तक्रारीची गरज तालुक्यात सर्वत्र भोंदूगिरी बोकाळली आहे. राजरोसपणे नागरिकांची फसवणूक होत आहे. मात्र, तक्रार देण्यास कुणीही पुढे येत नाही. लेखी तक्रार नसल्यामुळे पोलीस कारवाई करत नाहीत. फसवणूक होऊनही लेखी तक्रार असल्याशिवाय पोलीस कारवाई करण्यास तयार नाहीत.