कोल्हापूर : अखंडपणे सुरू असलेला ‘जोतिबाच्या नावानं चांगभलं’चा गजर, सजलेल्या, गगनाला भिडणाऱ्या सासनकाठ्या, खोबरं-गुलालाची उधळण, हलगी-ताशांचा कडकडाट... लाखोंच्या संख्येने आलेल्या आबालवृद्ध भाविकांची मांदियाळी, अशा मंगलमयी वातावरणात श्री जोतिबा देवाची चैत्र यात्रा शुक्रवारी पार पडली. देशाच्या कानाकोपऱ्यांतून आलेल्या भाविकांच्या अलोट गर्दीने आणि गुलालाच्या उधळणीने अवघा डोंगर न्हाऊन निघाला. महाराष्ट्र, कर्नाटकसह विविध राज्यांतील भाविकांचे कुलदैवत व श्रद्धास्थान असलेल्या जोतिबा देवाची चैत्र यात्रा म्हणजे वर्षभरातला सर्वांत मोठा उत्सव. यानिमित्त शुक्रवारी पहाटे देवाची काकड आरती, पाद्यपूजा झाली. पन्हाळ्याचे तहसीलदार प्रशांत पिसाळ यांच्या हस्ते शासकीय अभिषेक झाला. नंतर देवाची सरदारी रूपात बैठी सालंकृत पूजा बांधण्यात आली. त्यानंतर देवाची मूर्ती दर्शनासाठी खुली करण्यात आली. दुपारी दीड वाजता निनाम पाडळी (जि. सातारा) गावची प्रथम क्रमांकाची मानाची सासनकाठी मंदिराच्या आवारात दाखल झाली. कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते या काठीचे पूजन झाले. यानंतर पाटणमधील विहे गावच्या दुसऱ्या क्रमांकाच्या काठीचे पूजन झाले. यावेळी कोल्हापूरच्या महापौर तृप्ती माळवी, खासदार धनंजय महाडिक, आमदार चंद्रदीप नरके, सत्यजित पाटील-सरुडकर, पाटणचे आमदार शंभूराज देसाई, आदी उपस्थित होते. पूजेनंतर सासनकाठ्यांच्या मिरवणुकीला प्रारंभ झाला. (प्रतिनिधी) शेतकऱ्यांना दिलासा मिळू दे...गेल्या दोन वर्षांत ऋतुचक्रात बदल झाला आहे. यावेळी अवेळी पडणाऱ्या पावसामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. ऋतुचक्र पूर्ववत होऊन शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, यासाठीच मी आज जोतिबा देवाकडे साकडे घातले आहे. तसेच एलबीटी, टोल, अडत असा सगळ्या प्रश्नांवर सकारात्मक तोडगा निघावा, अशी प्रार्थना कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केली.शेकडो सासनकाठ्यांची मिरवणूकदेवस्थानच्या मानाच्या सासनकाठ्या ९८ आहेत. अन्य मानकरी असे मिळून एकूण १०८ सासनकाठ्या आहेत. याशिवाय प्रत्येक गावातील सासनकाठी वेगळी. अशा रीतीने शेकडोंच्या संख्येने आलेल्या सासनकाठ्यांची क्रमांकानुसार मिरवणूक सुरू झाली. मंदिराच्या बाह्य परिसरात भाविक यात्रेचा मनमुराद आनंद लुटत होते. सायंकाळी पालखी सोहळ्याला सुरुवात झाली.
भक्तिभावात रंगली चैत्र यात्रा
By admin | Updated: April 3, 2015 23:59 IST