कोल्हापूर : स्वित्झर्लंड येथील कंपनीकडून दामतिप्पट पैसे मिळविण्याचे आमिष दाखवून मित्राची सुमारे १५ लाख रुपयांची फसवणूक करणारा भामटा संशयित ऋषी रावत (रा. मंगळवार पेठ) हा फरार झाला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. दरम्यान, अमित पाटील यांनी ज्या बँकेत पैसे भरले त्या बँकेच्या अकौंटवरील माहिती पोलिसांनी मागविली आहे. राजारामपुरी १३ वी गल्ली येथे राहणारे अमित अनिल पाटील यांची चॉकलेटची एजन्सी होती. मंगळवार पेठेतील ऋषी रावत याचे किराणा मालाचे दुकान असल्याने पाटील हे याठिकाणी होलसेल दरामध्ये चॉकलेट पुरवित असत. त्यामधून दोघांची ओळख झाली. या ओळखीचा गैरफायदा घेऊन संशयित ऋषी रावत याने स्वित्झर्लंड येथील एका कंपनीची भारतातील फ्रॅँचायजी माझ्याकडे आहे. या कंपनीत साखळी पद्धतीने पैसे गुंतवल्यास मी दामतिप्पट करून देतो, असे सांगून पाटील यांच्याकडून पैसे घेतले. त्यानंतर अमित पाटील यांनी दामतिप्पट पैशांची मागणी केली असता, ऋषी रावत हा उडवाउडवीची उत्तरे देऊन पैसे देण्यास टाळाटाळ करू लागल्याने पाटील यांनी त्याच्या विरोधात राजारामपुरी पोलिसांत फिर्याद दिली. रावत हा गेल्या सहा-सात महिन्यांपासून कोल्हापुरातून पसार झाला आहे. त्याचे वास्तव्य मुंबईत असल्याचे समजते. दरम्यान, राजारामपुरी परिसरातील एका नॅशनल बँकेला पोलिसांनी पत्र पाठवून अकौन्टची माहिती मागविली आहे. याप्रकरणी अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक श्रीमती आर. जी. नदाफ करीत आहेत. (प्रतिनिधी)
भामटा ऋषी रावत फरार
By admin | Updated: December 7, 2014 00:57 IST