खोची : येथील श्री क्षेत्र भैरवनाथाचा चैत्र पालखी सोहळा मोजक्याच मानकरी, सेवेकरी यांच्या उपस्थितीत रात्री बारा वाजता झाला. सलग दुसऱ्या वर्षी कोरोनाच्या महामारीमुळे भाविकांविना पालखी सोहळा संपन्न झाला.
या यात्रेला महाराष्ट्र, कर्नाटक राज्यातील लाखो भाविक उपस्थिती लावतात. मात्र, गेल्यावर्षीप्रमाणे यावर्षीही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व कार्यक्रम रद्द केल्याने यात्रेला भाविकांना उपस्थित राहता आले नाही.
पालखी सोहळा व लग्न सोहळा मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत झाला. पहाटे विधिवत अभिषेक, आरती, पूजा झाली. रात्री बारा वाजता श्रींची पालखी मंदिरातून चैत्रबनात गेली. तेथे सेवेकरी, मानकरी यांचा सत्कार झाला. त्यानंतर सईच्या झाडाखाली श्रींच्या मूळ स्थानी आरती करण्यात आली. त्यानंतर वारणा नदीकाठी श्रींना स्नान घालण्यात आले. त्यानंतर पहाटे पालखी पळवत मंदिरासमोर आली. पालखी मंदिराला प्रदक्षिणा घालून राजसदरेवर विसावली.
पहाटे श्रींचा व सहचारिणी जोगेश्वरी यांच्या विवाहासाठी अलंकृत पूजा बांधण्यात आली. नाथबुवांनी मंत्रोच्चारात अक्षता म्हटली. श्रींचा विवाह सोहळाही मोजक्याच सेवेकरी, मानकरी यांच्या उपस्थितीत झाला. ग्रामपंचायत प्रशासन व पेठवडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
फोटो - हातकणंगले तालुक्यातील खोची येथील ग्रामदैवत भैरवनाथ व सहचारिणी जोगेश्वरी यांच्या विवाहासाठी अलंकृत पूजा बांधण्यात आली होती.