कोल्हापूर : भुदरगड नागरी सहकारी पतसंस्थेच्या ठेवीदारांच्या १० ते २० हजार रुपयांपर्यंतच्या ठेवी परत करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने मान्यता दिल्याची माहिती पतसंस्थेच्या अवसायक मंडळाचे अध्यक्ष तथा विभागीय सहनिबंधक राजेंद्र दराडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात प्रत्यक्ष ठेवी वाटपास शाखेत सुरुवात करणार असल्याचेही सांगितले. न्यायालयाच्या आदेशानुसार पतसंस्थेच्या लहान ठेवीदारांच्या ठेवी वाटपाचे काम गेली दोन-अडीच वर्षे सुरू आहे. पहिल्या टप्प्यात दहा हजार रुपयांपर्यंतच्या ठेवी वाटपास परवानगी दिली होती. दहा हजार रुपयांचे ८१ हजार ठेवीदार आहेत; पण त्यांपैकी केवळ १५ हजार ठेवीदारांनी आपल्या ठेवी परत घेतल्या. उच्च न्यायालयाच्या परवानगीनुसार १० ते २० हजार रुपये ठेवी देण्यास मान्यता मिळाली. ठेवीदारांना एकूण आठ कोटी दहा लाखांच्या ठेवी देय आहेत. त्याचे वाटप जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होणार आहे. ठेवीदारांनी शाखेतून ठेवी घ्याव्यात, असे आवाहन राजेंद्र दराडे यांनी केले. थकबाकीदारांच्या मालमत्ता लिलावाची प्रक्रिया सुरू केली असून, एकाच वेळी लावलेल्या ८० लिलाव प्रक्रियेत लोकांनी सहभागी व्हावे, असेही सांगितले. यावेळी पतसंस्थेचे व्यवस्थापक ए. जी. नाईक, नारायण पोवार उपस्थित होते. (प्रतिनिधी)सात वर्षांत साडेनऊ कोटींची वसुली पतसंस्थेवर अवसायक मंडळ कार्यरत होऊन सात वर्षे झाली. या कालावधीत कर्जदारांकडील १६० कोटी येणे रकमेपैकी केवळ साडेनऊ कोटींची वसुली झाली आहे.
‘भुदरगड’च्या ठेवी मिळणार
By admin | Updated: December 24, 2014 00:21 IST