लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : लवकरात लवकर व विना अडचण कर्ज देणाऱ्या, अनधिकृत डिजिटल संस्था, मोबाईल ॲप्सना व्यक्ती व छोटे उद्याेग वाढत्या प्रमाणावर बळी पडत आहेत. त्यापासून सावध राहावे, असे आवाहन भारतीय रिझर्व्ह बँकेचे मुख्य महाव्यवस्थापक योगेश दायाल यांनी केले आहे.
फसवणुकीच्या घटना वारंवार घडू लागल्याने रिझर्व्ह बँकेने हे निवेदन प्रसिध्दीस दिले आहे. त्यात म्हटले आहे की, जनतेने बेकायदेशीर कार्यकृतींना बळी पडू नये. ऑनलाईन, मोबाईल ॲप्सद्वारा कर्ज देऊ करणाऱ्या कंपन्या, संस्थांचा खरेपणा पूर्वइतिहास पडताळून पहावा. त्याशिवाय ग्राहकांनी त्यांच्या केवायसी कागदपत्रांच्या प्रती अज्ञात व्यक्ती, सत्यांकन न केलेल्या अनधिकृत ॲप्सबरोबर कधीही शेअर करू नयेत. असे ॲप्स व त्याच्याशी संबंधित बँक खात्यांची माहिती, संबंधित कायदा अंमलबजावणी एजन्सीला कळवावी किंवा ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठी तसेच पोर्टलचा (https://sachet.rbi.org.in) उपयोग करावा. लवकरात लवकर व विना अडचण कर्ज देणाऱ्या संस्थांकडून, कर्जदारांकडून अधिकाधिक व्याज दर व छुपे आकार आकारले जातात. कर्ज वसुलीसाठी अस्वीकार्य व दडपशाही केली जाते. कर्जदारांच्या मोबाईल फोन्सवरील डेटा मिळविण्यासाठी कराराचा गैरवापर केला जात आहे. बँका व एनबीएफसींच्यावतीने वापरण्यात येणाऱ्या डिजिटल कर्जदायी प्लॅटफॉर्म्सनी, त्यांच्या ग्राहकांना बँक, बँकांची किंवा एनबीएफसींची नावे सुरुवातीलाच सांगावीत.