महाराष्ट्र व कर्नाटक राज्याच्या सीमेलगत असणाऱ्या गणेशवाडीमध्ये मटका बुक्की जोरात सुरू आहे. कर्नाटक राज्यातून मटका खेळण्यासाठी येत असल्याने गणेशवाडी मटक्याचे केंद्र बनला आहे. याकडे कुरुंदवाड पोलिसांनी दुर्लक्ष केल्यामुळे दिवसेंदिवस मटका जोरात वाढत आहे.
कर्नाटक राज्यांच्या सीमेलगत गणेशवाडी गाव आहे. कर्नाटकमधील कागवाड पाच किलोमीटर अंतरावर आहे. याचा फायदा घेत कर्नाटकमधून मटका खेळण्यासाठी गणेशवाडीत येतात. पानपट्टी, हॉटेलसह परिसरात फिरून मोबाईलवर मटका घेतला जातो. पोलिसांच्या हेतुपुरस्सर दुर्लक्षामुळे मटका बुक्कीचे चांगलेच फावले असून दिवस-रात्र मटका खेळणाऱ्यांची गर्दी उसळत आहे.
कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमांच्या प्रश्नामुळे या अवैध धंद्यावर कारवाई कोण करणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. ओपन-क्लोजची चर्चा कुरुंदवाडपासून आल्याने या धंद्यात हळूहळू स्पर्धा वाढली आहे. यातून अनेक वेळा वादावादीचे प्रकार झाले आहेत. याकडे कुरुंदवाड पोलीस केव्हा ठोस कारवाई करणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
तत्कालीन आय. पी. एस. अधिकारी एस. चैतन्य यांनी इचलकरंजी विभागांचे उपअधीक्षक असताना छापा टाकून जुगार आणि मटक्यावर मोठी कारवाई करून मटका बंद पाडला होता. मात्र कालांतराने पुन्हा हा व्यवसाय फोफावला आहे.
चौकट - पोलिसांना चकवा
गणेशवाडीमध्ये सीमेचा फायदा घेत मटका बुकी पोलीस कारवाई करण्यासाठी आले तर पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या कर्नाटक राज्यातील कागवाडमध्ये पलायन करून पोलिसांना चकवा देतात. यामुळे पोलिसांना रिकाम्या हातांनी परतावे लागते.