कोल्हापूर : येथील पाचगावमधील केएमटी कॉलनीत महिलेला काठीने मारहाण करुन तिच्या पती व मुलाला ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी तिघांवर करवीर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल लोहार (रा. केएमटी कॉलनी, पाचगाव), यासीन नदाफ (रा. चंद्राईनगर, कंदलगाव), यश पवार (रा. म्हाडा कॉलनी, आर. के. नगर) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत.
पूर्ववैमनस्यातून विशाल लोहारसह तिघांनी संशयित वहिदा इकबाल शानेदिवाण (वय ४०, रा. केएमटी कॉलनी, पाचगाव, ता. करवीर) यांच्या घरासमोर येत शानेदिवान यांच्याशी वाद घालत ‘तुमच्या मुलाला हजर करा अन्यथा त्याच्यासह तुमच्या पतीला जिवंत सोडणार नाही’, अशी धमकी दिली. यावेळी तिघांनी शिवीगाळ करत काठीने शानेदिवाण यांना मारहाणही केली. या मारहाणीत वहिदा शानेदिवाण या जखमी झाल्या आहेत. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरुन तिघांवर करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.