कोल्हापूर : शहर आणि जिल्ह्यात डेंग्यू आणि चिकुनगुनिया, काविळचे रुग्ण वाढत आहेत. यामुळे ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र, तालुका, जिल्हा रुग्णालयातील ओपीडी रुग्णांनी फुल्ल झाले आहेत. अलीकडे या रुग्णालयात पाय ठेवायलाही जागा मिळेनासी झाली आहे.
पावसामुळे अनेक ठिकाणी साचलेल्या पाण्यात डासांची निर्मिती मोठ्या प्रमाणात झाली आहे. एडीस इजिप्ताय डासापासून डेंग्यू, चिकुनगुनिया आजार बळावतो. त्याचा फैलावही होतो. घरात आणि परिसरातील साठलेल्या पाण्यात या डासाची उत्पत्ती होते. यामुळे डेंग्यू, चिकुनगुनियाचे रूग्ण वाढत आहेत. नैसर्गिक स्रोत, प्रवाहीत पाणीही दूषित झाल्याने पिण्यासाठी स्वच्छ, शुद्ध पाण्याचा अभाव आहे. परिणामी दूषित पाण्यामुळे काविळचे रुग्ण वाढत आहेत. एकेका कुटुंबांत अनेक रुग्ण सापडत आहेत. या आजाराची गावात साथ आल्यासारखी परिस्थिती आहे. हे तिन्ही आजार किरकोळ आहेत. पण दुर्लक्ष झाल्यास जीवघेणा ठरत आहे. शहरात डेंग्यूने मृत्यू होण्याच्या घटनाही घडल्या आहेत.
१) सध्या उपचार घेत लेले रुग्ण
डेंग्यू - २६
चिकुनगुनिया - ३७
काविळ - १६
२) रोज किमान १० पेशंट
डेंग्यू, चिकुनगुनिया, कावीळचे रोज कमीत कमी ५ आणि अधिकाधिक १० रुग्ण मिळत आहेत. या आजाराने गंभीर असलेले रुग्ण रुग्णालयात दाखल होवून उपचार घेत आहेत. पहिल्या टप्प्यातील रुग्ण ओपीडीमध्ये उपचार घेवून घरी जाताना दिसतात.
३) लहान मुलांचे प्रमाण जास्त
साथीच्या आजाराला लहान मुलेही मोठ्या प्रमाणात बळी पडत आहेत. डेंग्यू, काविळ या आजाराचे प्रमाणत लहान मुलांमध्ये जास्त प्रमाणात आढळत आहे. यामुळे बालरोगतज्ज्ञांकडेही बाल रुग्णांची गर्दी होत आहे.
४) काय आहेत लक्षणे?
डेंग्यू - तीव्र ताप, तीव्र डोके दुखी, स्नायूदुखी, सांधेदुखी, उलट्या होणे, तीव्र डोळेदुखी, अशक्तपणा, भूक मंदावणे, जास्त तहान लागणे, तोंडाला कोरड पडणे, ताप कमी व जास्त होणे, अंगावर पुरळ येणे, त्वचेखाली रक्तस्राव, नाकाकडून रक्तस्राव, रक्ताची उलटी, रक्तमिश्रित किंवा काळसर रंगाची शौचास होणे, पोट दुखणे.
चिकुनगुनिया - ताप, डोकेदुखी, मळमळ, सांधेदुखी.
कावीळ - ताप, भूक मंदावणे, मळमळणे, थकवा येणे, उलटी होणे, डोळे पिवळे दिसणे, लघवी पिवळी होणे.
५) कोट
सध्या डेंग्यू, चिकुनगुनिया रुग्ण आढळण्याचे प्रमाण वाढले आहे. यावर वेळेत उपचार होणे गरजेचे आहे. म्हणून लक्षणे जाणवता क्षणी रक्तांची तपासणी करून घेवून निदान, उपचार घ्यावेत.
डॉ. विनोद मोरे, जिल्हा हिवताप अधिकारी