निपाणी : कॉर्पोरेशन बँकेच्या निपाणी शाखेतून चार लाखांची रक्कम काढल्यानंतर दुचाकीला घाण लावून बॅग लांबविल्याची घटना आज, गुरुवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास येथील अशोकनगर येथे घडली. कॉर्पोरेशन बँकेतील लिपिक गणपती लोकरे (मूळगाव चिखली, ता. कागल) असे लुटलेल्या व्यक्तीचे नाव आहे.चिखली (ता. कागल) येथील नामदेव लोकरे हे निपाणीजवळील सौंदलगा येथील कॉर्पोरेशन बँकेमध्ये लिपिक म्हणून कार्यरत आहेत. निपाणी शाखेतील रक्कम आणण्यासाठी ते आपल्या दुचाकी (एमएच ०९ सीई ०८३०)वरून निपाणीस गेले होते. या शाखेतून त्यांनी अकरा वाजण्याच्या सुमारास चार लाखांची रक्कम काढून बॅगेत ठेवली. ही बॅग त्यांनी दुचाकीला अडकविली.दुचाकी चालू करताना लोकरे यांच्या हाताला चिकट घाण लागली. त्यामुळे ते शेजारील बाणदार यांच्या इलेक्ट्रिकच्या दुकानात हात धुण्यासाठी गेले. काही क्षणात ते परत दुचाकीजवळ आले. मात्र, अडकवलेली चार लाखांची बॅग चोरट्यांनी लांबविल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी आजूबाजूला शोधाशोध केली; पण चोरटे सापडले नाहीत. घटनास्थळी फौजदार होसमनी यांनी भेट देऊन पंचनामा केला. या घटनेची बसवेश्वर चौक पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. (प्रतिनिधी)बॅग घेऊन लहान मुले पळालीदरम्यान, मुरगूड येथील मधुकर पाटील हे आपल्या लहान बाळाला रुग्णालयात उपचारासाठी घेऊन आले होते. रस्त्यावर उभे असता आठ ते बारा वयोगटातील तीन लहान मुले बॅग घेऊन पळत जात असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. पाटील यांनी त्यांचे वर्णन पोलिसांना सांगितले असून, पोलीस त्या मुलांचा शोध घेत आहेत.
बँक कर्मचाऱ्याला चार लाखांना लुटले
By admin | Updated: September 19, 2014 00:03 IST