म्हाकवे : बानगे (ता. कागल) येथे अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आरोग्य उपकेंद्र मंजूर झाले. या उपकेंद्राच्या इमारत बांधकामासाठी एक कोटी अठ्ठावीस लाख रुपयांचा निधीही मंजूर झाला आहे. परंतु, या उपकेंद्रात आरोग्य कर्मचारीच नसल्याने पुन्हा हे आरोग्य उपकेंद्र ‘असून अडचण नसून खोळंबा’ अशीच स्थिती बनली आहे. त्यामुळे ऐन कोरोनाच्या संकटकाळात ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे येथे त्वरित आरोग्य कर्मचाऱ्यांची भरती करावी अन्यथा पिंपळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रालाच टाळे ठोकण्याचा इशारा सरपंच वंदना रमेश सावंत यांच्यासह येथील ग्रामस्थांनी दिला आहे.
येथे सुमारे सहा हजार लोकसंख्या आहे. मात्र, एकही आरोग्य कर्मचारी नसल्याने ग्रामस्थांना खासगी सेवेवरच अवलंबून राहावे लागत आहे. सामान्य कुंटुंबातील ग्रामस्थांना हा खर्च न परवडणारा आहे. याबाबत पिंपळगाव प्राथमिक केंद्रातील आरोग्य अधिकारी शुभम जाधव यांना धारेवर धरत ग्रामस्थांनी जाब विचारला.
येथील तरुणांनी कोरोनाला रोखण्यासाठी तालुक्यात पहिल्यांदा कोविड सेंटर उभारले आहे. मात्र, आरोग्य कर्मचारी नसल्याने हे कोविड सेंटर बंद करणार असल्याचेही युवकांसह सरपंच सावंत यांनी सांगितले.
"बानगे उपकेंद्रात कर्मचारी भरतीबाबत आरोग्य विभागाकडे लेखी प्रस्ताव सादर करणार आहोत.त्यामुळे काही कालावधीसाठी ग्रामस्थांनी आरोग्य विभागाला सहकार्य करावे.
डॉ शुभम जाधव
आरोग्य अधिकारी,पिंपळगाव बुद्रुक