गेल्या वीस दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने रविवारी रात्री नऊ वाजल्यापासून दमदार हजेरी लावली. या पावसाने सुकू लागलेल्या खरीप पिकांना जीवदान मिळाले आहे. पावसाच्या हजेरीने शेतकरी आनंदी झाला आहे.
धामणी खोरा ( ता.पन्हाळा )परिसरात गेले वीस दिवस पावसाने दडी मारल्याने पिके वाळू लागली होती.सुरुवातीला पाऊस चांगला झाल्याने टोकण केलेल्या भाताची उगवण चांगली झाली. पण अचानक पाऊस गायब झाल्याने पिके पिवळी पडू लागली. त्यामुळे दुबार पेरणी करावी लागते की काय यांची चिंता शेतकऱ्यांना लागली होती तसेच पाण्याअभावी माळरानातील भात रोप लागणीची कामे खोळंबली होती. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त होऊन पावसाची प्रतीक्षा करत होता.
दोन दिवस ढगाळ वातावरण होते. पण पाऊस हुलकावणी देत होता. रविवारी रात्री नऊ वाजता पावसाने दमदार सुरूवात केली. पावसाची संततधार अशीच राहिली तर खोळंबलेल्या रोप लागणीच्या कामाला गती येणार आहे.