कोल्हापूर : महापालिकेच्या आगामी निवडणुकीमध्ये हक्काचा मतदार मतदानापासून वंचित राहू नये यासाठी इच्छुक, विद्यमान नगरसेवकांकडून धडपड सुरू झाली आहे. निवडणूक आयोगाने शनिवार (दि. ५)पासून मतदार नोंदणीसाठी विशेष शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिरात आपल्या हक्काच्या नवमतदारांची नोंदणी कशी जास्त होईल, यासाठी त्यांनी मोर्चेबांधणी लावली आहे. नवीन मतदार नोंदणी करण्याचे आवाहन करणारे संदेश सोशल मीडियावरून पाठविले आहेत. कोणती कागदपत्रे लागणार याचीही माहिती दिली आहे.
कोरोनामुळे कोल्हापूर महापालिकेची निवडणूक अनिश्चित काळासाठी लांबणीवर गेली आहे. पुढील सहा महिन्यांत कोणत्याही क्षणी निवडणूक जाहीर होण्याचे संकेत आहेत. त्यामुळे काही विद्यमान नगररसेवक आणि इच्छुकांकडून आतापासून जनसंपर्क सुरू केला आहे. आरक्षणाचा विचार करून काहींनी दोन प्रभागांवर डोळा ठेवला आहे. मतदानासाठी किती तारखेपासूनची मतदार यादी ग्राह्य धरली जाणार, याबाबत अद्यापही राज्य निवडणूक आयोगाकडून कोणतेही स्पष्ट आदेश आलेले नाहीत.
यामध्येच भारत निवडणूक आयोगाने मतदार नोंदणी पुनरीक्षण कार्यक्रम हाती घेतला असून, शनिवारी (दि. ५) आणि रविवारी तसेच १२ व १३ डिसेंबर रोजी विशेष शिबिराचे आयोजन केले आहे. नवमतदार नोंदणी, मतदान ओळखपत्रावरील नाव, पत्त्यामध्ये दुरुस्ती करणे, नाव एका यादीतून दुसऱ्या यादीत स्थलांतरित करणे, मृत व्यक्तीचे नाव वगळणे अशी कामे करता येणार आहेत. यामुळे नुकतीच वयाची १८ वर्षे पूर्ण झालेल्या नवमतदारांची नोंदणी करण्याची इच्छुकांना पर्वणी आली आहे.
चौकट -
महापालिकेची निवडणूक चुरशीने होत असते. केवळ चार ते पाच मतांनी पराभव झाल्याचीही अनेक उदाहरणे आहेत. जवळच्याच व्यक्ती, कार्यकर्ते अथवा समर्थकाने मतदार यादीत नाव नसल्यामुळे मतदान केले नसल्याचा निकालानंतर पश्चात्ताप करावा लागू नये म्हणून काहींकडून मतदार नोंदणीसाठी धडपड सुरू आहे.