लोकमत न्यूज नेटवर्क खोची : दुसऱ्याच्या शेतात मोलमजुरी, गावोगावी हातगाडा ढकलत भंगार गोळा करणारे...भांड्याला कलई करून चकाकी देत...सुई धागा टोपलीत घेऊन पायपीट करीत पै अन् पैची पुंजी जमवीत, वासुदेव आला रे वासुदेव आला, हे लोकगीत परिसरातील गावात सादर करीत सण-संस्कृतीचा महिमा गात, नदीच्या पाण्यात जीव धोक्यात घालून बेभरवशाची मच्छिमारी करत दारिद्र्याचे ओझे पाठीवर घेऊन जीवन प्रवास करणारा भेंडवडे (ता.हातकणंगले)येथील वासुदेव बागडी समाज महापुराच्या तडाख्यात उद्ध्वस्त झाला आहे. गेल्यावेळच्या महापुरातून सावरायच्या आत पुन्हा संसार वाहून गेल्याने हा समाज पुरता हबकून गेला आहे.
वारणा नदीच्या काठी भेंडवडे हे गाव वसलेले आहे. या गावाच्या पश्चिमेस या समाजाची वस्ती असून, साध्या दगड-विटांच्या, पाला चिपडाच्या छोट्या छोट्या घरात ते राहत आहेत. अनेक गैरसोयींची येथे गर्दीच आहे. विकासाची पहाट कधी उगवेल, याच विवंचनेत हा समाज दररोज दिवस ढकलत आहेत. त्यांच्यावरच महापुराच्या संकटाने मोठे आक्रमण केले.
अनपेक्षितरीत्या दोनच दिवसात पाण्याच्या पातळीत वाढ झाली. हातात लागेल, पाठीवर बसेल तेवढे साहित्य घेऊन ही माणसं घरातून बाहेर पडली. सोबत दावणीची जनावरं घेतली. वसाहतीतील शाळेत व नरंदे येथील नरंदे हायस्कूलच्या शाळेत मुक्कामास गेली. अख्या वस्तीतील ९० कुटुंबांवर ही स्थलांतराची वेळ आली.
विशेष म्हणजे संपूर्ण गावाला पाण्याने वेढा दिला. ५५० कुटुंबातील २३५० लोकांचे व ८५० जनावरांचे स्थलांतर झाले. सर्वजण सुखरूप गावच्या बाहेर पडलीत.
गतवेळच्या महापुराची अनुभूती पाठीशी असल्याने उद्ध्वस्ततेचे चित्र त्यांच्यासमोर उभे राहिले; पण पर्याय नव्हता. अखेर तेच वास्तवात येत पुन्हा कसं उभं राहायचं, या चक्रात ते अडकले आहेत.
चार दिवसांच्या मुक्कामानंतर पाणी ओसरण्यास सुरुवात झाली. चेहऱ्यावरची चिंतेची मळभ दूर सारीत गावकरी एकमेकांच्या साथीने घराच्या अस्तित्वाचा शोध घेण्यासाठी दबकत दबकत चालू लागलीत.
भिंतींना तडा गेल्यात, भिंती ढासळल्यात, घरे कोसळलीत, कपडालत्ता..भांडीकुंडी...अंथरुण पांघरून बेपत्ता झालेत...पुराच्या पाण्यात अनेक जीवापाड जपलेल्या वस्तू वाहून गेल्यात ......सारं काही होत्याचं नव्हतं झाल्याचे वास्तव घराच्या आत-बाहेर आता पाहण्याची दुर्दैवी वेळ त्यांच्यावर आली आहे.
गावात, गल्लीत, घरात सगळीकडे दुर्गंधी पसरली आहे. चिखलाची दलदल, घाणीचे साम्राज्य, आजाराचे दिव्य जणू समोर ठाकले आहे.
पूर ओसरल्यानंतर घरी परतल्यानंतर प्रत्येकाचा चेहरा आता पुढे काय होणार, याने भेदरलेला दिसत आहे. हा पूर ग्रामस्थांच्या जीवनाचा सूरच उलटा करणारा ठरला आहे.
फोटो ओळी-१)भेंडवडे येथील छोट्या व्यावसायिकांची खोकी वाहून जाऊन उलटी झाली आहेत. २)भेंडवडे गावात स्वच्छता करण्यासाठी ग्रामपंचायतीने मोहीम राबविली आहे. (छाया-आयुब मुल्ला)