कोल्हापूर : चुकीच्या पद्धतीने मिळकतींवर ब सत्ताप्रकारच्या नोंदी केल्याचा फटका शहरातील नागरिकांना बसत आहे. त्याचबरोबर बिगरशेती नोंद असलेल्या भूखंडाकरिता विकासाची परवानगी देण्यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांच्या ‘ना हरकत दाखल्या’ची मागणी होत आहे. महसूल विभागाच्या या जाचक अटीमुळे शहरातील खरेदी-विक्रीचे व्यवहारावर गेल्या काही महिन्यांपासून परिणाम झाला आहे. शहरातील अनेक मिळकतीच्या सात-बारा उताऱ्यावर चुकीच्या पद्धतीने ‘ब’ सत्ताप्रकार म्हणून नोंदी झाल्या. सर्व्हे झालेल्या मिळकतींवर करवीर तहसीलदारांनी १६ फेब्रुवारी २००८ रोजीच्या पत्रान्वये ‘ब’ सत्ताप्रकार मिळकतीची दस्तनोंदणीवेळी चौकशी करून बी टेन्युअर मिळकतीस सक्षम प्राधिकाऱ्याची परवानगी घेऊन नोंदणी करावी, असे आदेश सर्व दुय्यम निबंधकांना दिले. कोल्हापूर शहरातील सत्तर ते ऐशी टक्के मिळकतींस ‘ब’ सत्ताप्रकार नोंद असल्याने हस्तांतरणास अडचणी आल्या. प्रमोटर्स अॅँड बिल्डर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची संबंधित अधिकाऱ्यांबरोबर बैठक झाली. नगरभूमापन अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करून बी टेन्युअर नमूद मिळकतीपैकी सरकारी भाड्याने दिलेल्या व भाडे भरण्यास पात्र मिळकतींची यादी तयार करण्याचा निर्णय झाला. यादीही व सिटी सर्व्हे क्रमांकही निश्चित झाले. त्या वगळून इतर मिळकती वगळणे आवश्यक होते; परंतु सरसकट मिळकतींवर ब सत्ताप्रकारची नोंद तशीच राहिली. प्रमोटर्स अॅँड बिल्डर्स, ‘क्रिडाई’च्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली.
‘ब’ सत्ताप्रकारच्या चुकीच्या नोंदी
By admin | Updated: July 12, 2015 00:17 IST